भीमेला पूरस्थिती निर्माण झाल्यास जबाबदार कोण ?

धरण 107 टक्के भरल्यानंतर ही नदीला पाणी सोडण्याचे नियोजन नाही

पंढरपूर : ईगल आय मीडिया

राज्यातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक असलेले उजनी 106 टक्के भरलेले आहे. दौंड येथे धरणात येणारा पाण्याचा फ्लो 16000 क्यूसेक्स एवढा आहे. तरीसुद्धा पाटबंधारे विभागाने भीमा नदीला पाणी सोडण्याचे नियोजन केलेले नाही. केवळ।कालवा, बोगदा आणि उपसा सिंचन योजना सुरू करून धरणातील तुडुंब भरलेल्या पाण्याकडे बघ्यांची भूमिका घेतली आहे. पुढच्या काळात भीमा नदीला पूरस्थिती निर्माण झाल्यास आणि शेतकऱ्यांची पिके वाहून गेल्यास कोणाला जबाबदार धरायचे ? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांतून विचारला जाऊ लागला आहे.

उजनी धरण हे राज्यातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक आहे. दरवर्षी पुणे जिल्ह्यात पाऊस पडल्यानंतर धरण भरते आणि नंतर सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीला पूर येतो. अनेक वेळा पूरस्थिती, आणी महापूर येऊन नदीकाठच्या शेतकऱ्यांचे शेकडो कोटी रुपयांचे नुकसान झालेले आहे.

गेल्यावर्षी सुद्धा भीमा नदीला पूरस्थिती निर्माण झाली होती. आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे शेकडो कोटी रुपयांचे नुकसान झाले. पीके वाहून गेली, शेती वाहून गेली, नदीवरील अनेक बंधाऱ्यांचे नुकसान झाले. हे बंधारे अजूनही नादुरुस्त आहेत. हा अनुभव असतानाही या वर्षी पूरस्थिती टाळण्यासाठी पाटबंधारे विभागाने कसलेही नियोजन केल्याचे दिसत नाही.

उजनी धरण मंगळवारी संध्याकाळी पाच वाजता 106 टक्के भरलेले आहे. येणारा विसर्ग दौंड ला 16 हजार क्यूसेक्स तर बंडगार्डन ला 11 हजार क्यू. इतका आहे. इकडे वीर धरणातून भीमा नदीला दररोज कमी अधिक पाणी सोडले जाते. त्यामुळे मागील महिनाभर झाले भीमा दुथडी भरून वाहते आहे. त्यात उजनीतून अचानक पाणी सोडले तर भीमा नदीला पूरस्थिती हमखास निर्माण होणार आहे. हे लक्षात घेता पूरस्थिती नियंत्रणात ठेवण्याच्या हेतूने अद्यापही भीमा नदीला पाणी सोडण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आलेले नाही.

सर्वच लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष ?

या प्रश्नाकडे अद्याप जिल्ह्यातील एकही लोकप्रतिनिधी ने लक्ष दिले नाही.पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभाग यांची उजनीच्या पाण्या संदर्भात आणि पूरस्थिती बाबत बैठक झाली असल्याचे समजत नाही. सध्या सगळ्या नेत्या, अधिकार्याचे लक्ष केवळ आणि केवळ कोरोणाकडे असून भीमेला पूर आल्यास नियंत्रण कसे करायचे याचे नियोजन शून्य असल्याचे दिसून येते.

पुणे जिल्ह्यात मागील पंधरा दिवसापासून सातत्याने जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतो आहे. पुणे जिल्ह्यातील आठ धरणे शंभर टक्के तर उर्वरित सर्व धरणे 90% पेक्षा जास्त भरलेली आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील धरणांची पाणी साठवण क्षमता सध्या जवळपास संपली आहे. अशा परिस्थितीत पुणे जिल्ह्यात पडलेल्या पावसाचे पाणी नियंत्रणात ठेवता येणार नाही, पाटबंधारे विभागाला हा पूर्वानुभव यापूर्वीसुद्धा आलेला आहे. त्यामुळे उजनी धरणामध्ये पूरस्थिती नियंत्रणात करण्यासाठी धरणात पुरेसी जागा असणे आवश्यक आहे. सद्यस्थितीला पाणलोट क्षेत्रात जरी पाऊस पडला तरी उजणीची साठवणक्षमता संपल्यामुळे पूरस्थितीवर नियंत्रण राखणे जवळपास अशक्य आहे.

भीमा नदीला संगम जवळ नीरा नदीचे ही पाणी येऊन मिळते. भीमा अधिक निरा दोन्ही नद्यांचे पाणी एकाच वेळी सोडावे लागल्यास माळशिरस, माढा, पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर या तालुक्यातील भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे. यापूर्वीचा पूरस्थितीचा, पूरस्थिती नियंत्रणाचा, पडणाऱ्या पावसाचा, धरणातील पाणीसाठा याचा अनुभव व आवश्यक तो डाटा हाती असूनही पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्याचे नियोजन अद्याप सुद्धा का केले नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गतवर्षीप्रमाणे यंदाही पूरस्थिती निर्माण झाल्यास आणि शेतकऱ्यांची पिके वाहून गेल्यास त्याला जबाबदार कोण धरायचे असा संतप्त सवाल शेतकरी विचारू लागले आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!