मोर्चाला पक्षीय स्वरूप आल्याने समाजात नाराजी
पंढरपूर : ईगल आय मीडिया
मराठा आरक्षण प्रश्नी 4 जुलै रोजी सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या मराठा आक्रोश मोर्चाकडे मराठा समाजानेच पाठ फिरवली असल्याचे दिसून येत आहे. या मोर्चाचे आयोजन भाजप नेत्यांच्या पुढाकारातून झाले असल्याने मोर्चाला राजकीय स्वरूप आले आहे. त्यामुळे मराठा समाजातील अन्य समाज संघटना, त्यांचे पदाधिकारी, सर्व सामान्य मराठा समाज या मोर्चापासून बाजूला असल्याचे आहे. तसेच या आक्रोश मोर्चाकडे मराठा समाजाने पाठ फिरवल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारने दिलेले आरक्षण रद्द केले असून केंद्र सरकारने यासंदर्भात केलेली फेरविचार याचिका सुद्धा फेटाळली आहे. यावरून मराठा समाजात प्रचंड अस्वस्थता आणि नाराजी सुद्धा आहे. मात्र सध्या कोरोनाचा काळ असल्याने समाजातील आघाडीच्या संघटना, राजकारण विरहित समाज कार्यात अग्रेसर राहिलेले अनेक पदाधिकारी सध्या थांबा आणि पहा या भूमिकेत आहेत. शिवाय कोल्हापुरचे युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी आरक्षण प्रश्नात लक्ष घातले असून त्यांच्या भूमीककडे समाज लक्ष देऊन आहे.
यातच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी राज्यभर मराठा आरक्षण आंदोलन छेडले आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर येथे 4 जुलै रोजी आक्रोश मोर्चा आयोजित केलेला आहे. या मोर्चाकडे जिल्ह्यातील मराठा समाजाने पाठ फिरवली आहे. समाजातील अनेक आघाडीच्या संघटना या मोर्चापासून बाजूला आहेत. तर सकल मराठा समाज म्हणून संघटन केलेले असंख्य राजकारणाबाहेर असलेले समाजातील कार्यकर्ते या आंदोलनापासून बाजूला असल्याचे दिसून येते.
सोलापूर जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांनीच आक्रोश मोर्चाचे आयोजन केले असल्याने हा मोर्चा भाजप प्रणित असल्याचे मानले जात आहे आणि भाजप समर्थक कार्यकर्तेच या मोर्चा च्या यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते. ग्रामीम भागात कुठेही आक्रोश मोर्चाबाबत समाजात कसलीच तयारी नाही आणि प्रतिसाद ही नसल्याने भाजप प्रणित आक्रोश मोर्चाकडे मराठा समाजाने पाठ फिरवल्याचे दिसून येते.