पोरं मंत्र्यांनाच म्हणाली , ‘ओ काका, आमचा फोटो काढा !’

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा अफलातून किस्सा

टीम : ईगल आय मीडिया

मुंबईत मरीन ड्राईव्ह च्या कट्टयावर बसलेल्या पोरांनी संध्याकाळी पाय मोकळे करण्यासाठी फिरणाऱ्या व्यक्तीला हाक मारली आणि, ओ काका, आमचा फोटो काढा की ! ‘ अशी साद घातली. त्या व्यक्तीने फोटोही काढला मात्र जेव्हा ती व्यक्ती कुणी सामान्य नाही तर राज्याचे मंत्री असल्याचे मुलांना समजले तेव्हा ते सर्व खजील झाले. आणि मग एक फोटो मंत्र्यांसोबत घेतला आणि तो काढला एका आमदारांनी.

मुंबईत सोमवारपासून हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. या निमित्ताने मुंबईत मंत्री हजर आहेत, संध्याकाळी मोकळे असलेले राज्यमंत्री तथा सोलापूर चे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांच्यासोबत मरीन ड्राईव्हवर फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडले.

मरीन ड्राईव्हवर चालत असतानाच 8 ते 10 मुलं थांबली होती,आणि त्यातील कुणी तरी सर्वांचा ग्रुप फोटो काढण्यासाठी जवळून जात असलेल्या पांढऱ्या शुभ्र कपड्यातील दत्तात्र्यय भरणे यांना ‘ ओ काका, आमचा फोटो काढा की ‘ म्हणून हाक दिली.

मंत्री भरणे यांनीही तात्काळ त्यांच्याकडील मोबाईल घेतला आणि फोटो काढले. मात्र नंतर त्या मुलांना समजले की, ज्यांना आपण फोटो काढायला लावले ते कुणी सामान्य गृहस्थ नाहीत तर राज्याचे मंत्री आहेत.तेव्हा ती मुलं सुद्धा खजील झाली आणि त्यांनी नंतर मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासोबत एक ग्रुप फोटो घेतला.

विशेष म्हणजे हा फोटो आम. आशुतोष काळे यांनी टिपला. या संदर्भात आ. काळे यांनीच फेसबुकवर पोस्ट करून झाला प्रकार उघडकीस आणला. यावरून मात्र मंत्री भरणे यांच्या साधे पणाची आणि त्या पोरांची ही जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!