चंद्रभागा नदीतील अतिक्रमणे हटणार की नाहीत ?

उपमुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतरही पालिका प्रशासन सुस्तच

पंढरपूर : ईगल आय मीडिया

नुकत्याच येऊन गेलेल्या महापुरात पंढरपूर शहरातील शेकडो घरात पाणी घुसले, संबंधित कुटुंबाना स्थलांतरित करावे लागले. याच बाधित कुटुंबातील नदी पात्रात अतिक्रमण करून राहणारे शेकडो लोक आहेत. ही अतिक्रमणे काढावीत अशी वेळोवेळी मागणी होऊनही त्यांना अभय दिले जाते. त्यामुळे महापूर आला की अशा कुटुंबाचं स्थलांतर आणि त्यांचं जीवनावश्यक गरजांची पूर्तता करण्याचे काम ही प्रशासनाला करावे लागते. शिवाय चांद्रभागेला बकालपण आले असून नदीत होणारे प्रदूषण आणखी वेगळा विषय आहे.


उपमुख्यमंत्री अजित पवार ही संतापले ! चंद्रभागा नदीच्या कुंभार घाटाची काम सुरू असलेली भिंत कोसळून 6 जण ठार झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. या घाटाची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार नुकतेच आले होते. त्यावेळी चंद्रभागा नदीत झालेले अतिक्रमण त्यांच्या नजरेस आले आणि नदीच्या बकालपनाविषयी त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना तिथेच सर्वांसमोर खडे बोल सुनावले होते. तरीही पालिका प्रशासन जागे झाले नाही असे दिसून येते.

पंढरपूर येथील चंद्रभागा नदीत गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झालेली आहेत. राजकीय प्रभावातून ही अतिक्रमणे होत आहेत आणि प्रशासकीय अनास्थेतून त्यांना पोषक वातावरण निर्माण होत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे होऊनही प्रशासन कारवाई करीत नाही, उलट त्यांना रस्ते, पाणी, वीज अशा मूलभूत सुविधा पुरवते. शिवाय महापूर आला की त्यांचे स्थलांतर, घरात पाणी गेले म्हणून वरून नुकसानभरपाई दिली जाते.

वोट बँक मजबूत करण्यासाठी राजकीय वरदहस्त ठेऊन ही अतिक्रमणे वाढवली आणि पोसली जात आहेत. या अतिक्रमणे हटवण्याची जबाबदारी नगरपालिका, महसूल आणि पाटबंधारे विभागाची सुद्धा आहे. मात्र कोणताही विभाग याबाबत ठोस पावले उचलत नाही, त्यामुळेच ही अतिक्रमणे सातत्याने वाढत आहेत. ही अतिक्रमणे हटवली जाणार आहेत की नाहीत असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!