हेलिकॉप्टरमधून आले आमदार महोदय : निपाणी तालुक्यातील अभिनव नामकरण सोहळा
टीम : ईगल आय मीडिया
हुन्नरगी ( ता.निपाणी, जि. बेळगाव, कर्नाटक ) येथील मानव बंधुत्व वेदिका संघटनेचे कार्यकर्ते प्रकाश बाळासाहेब बरगाले व नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या नूतन ग्रा.पं.सदस्या भारती प्रकाश बरगाले या दांपत्याने आपल्या बाळाचे बारसे चक्क स्मशानभूमीत घातले. आणि या आगळ्या वेगळ्या उपक्रमासाठी कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ. सतीश जारकीहोळी यांच्यासह माजी मंत्री विरकुमार पाटील, माजी. आ. काकासाहेब पाटील उपस्थितीत पार पडला. विशेष म्हणजे आम. जारकीहोळी यांचे कार्यक्रमासाठी बेळगावहून हेलिकॉप्टरने आगमन झाले.
नाव ठेवले भिमराव !
बरगाले कुटुंबियांवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव असल्याने या दांम्पत्याने आपल्या नवजात बालकाचे नाव भिमराव असे ठेवून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर असलेले प्रेम दाखवून दिले.
यावेळी भव्य शामियाना दिला होता, शिवाय वाद्यांचा गजर, तसेच सजवलेला पाळणा, फटाक्यांची आतषबाजी अशा स्वरूपात कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ.सतीश जारकीहोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा नामकरण सोहळा पार पडला. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.
यावेळी बोलताना जारकीहोळी म्हणाले ,महात्मा जोतीराव फुले सावित्रीबाई फुले छत्रपती शाहू महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर बुद्ध, बसवेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज या व्यक्तींनी समाजातील जाती अंतासाठी व अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढा दिला त्यांचा हा लढा आपण पुढे चालवण्याचे काम मानव बंधुत्व वेदिके च्या माध्यमातून सुरू केले आहे.आ.जारकीहोळी पुढे बोलताना म्हणाले, गावागावात मंदिर निर्माण करण्यापेक्षा शाळा निर्माण कराव्यात शाळांमुळे अनेकांचे जीवनमान सुधारते तर मंदिरांमुळे भिक्षुकांची संख्या वाढत आहे स्मशानभूमीत बालकांचा नामकरण करण्याचा हा पहिलाच उपक्रम बरगाले कुटुंबाने हाती घेऊन समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे याचा आपणास सार्थ अभिमान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री वीरकुमार पाटील,माजी आ काकासाहेब पाटील, सुनील हनमनावर, जि पं सदस्य राजेंद्र वडर, अण्णासाहेब हवले, प्रमुख उपस्थित होते. नवजात बालकाचे वडील प्रकाश आई भारती ,आजोबा बाळासाहेब व आजी गौराबाई या सर्वांचा जारकीहोळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी स्वागत करून कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश स्पष्ट केला.