चिंचणी : पर्यावरण संपन्न, स्वयंपूर्ण आणि आदर्श गाव !

पंढरपूर तालुक्यातील चिंचणी या आदर्श गावच्या उभारणी वर आणि वाटचालीवर टाकलेला एक दुष्टीक्षेप

स्वातंत्र्य प्राप्तीनंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणाले होते, ” खरा भारत खेड्यात आहे, त्यामुळे भारताच्या उभारणीसाठी खेड्यांकडे चला !” म. गांधीना अभिप्रेत आदर्श, स्वयंपूर्ण, समृद्ध भारताचे चित्र दाखवणारे गाव कल्पनेतच आहे. गावातील लोकांनी विचारांनी प्रगल्भ असणे, जेथे लोक गांव स्वच्छ तर ठेवतीलच, परंतु जिथे समृद्धी नांदत असेल हिरवळ वृक्षांच्या रूपानं, सुसज्य ग्रंथालयाच्या रुपानं, उद्याचा भारत घडवणाऱ्या शाळेच्या रुपानं घडवेल हे अपेक्षित होते. पंढरपूर तालुक्यात ‘चिंचणी’ हे गाव अगदी महात्मा गांधींच्या विचारातले गाव आपल्याला आज सापडते.

जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याचे पालक शाळेला पैसे देताना दहावेळा विचार करतात आणि तेच पालक मंदिरांना एक हजार रुपयांची देणगी देताना अजिबात विचार करत नाहीत. ही सध्या आपल्या देशाची मानसिकता आहे. खेड्यातील जुन्या विचारांची पिढी जरी कमी होत असली, तरी नवीन माणूस जुन्याच विचाराने उभा राहतोय हेही चित्र सरास खेड्यात दिसते आहे. घरात वाटण्या होताच बांध पोखरण्याची सवय कमी होत नाही, हे एकच उदाहरण नाहीये. ही आजच्या बऱ्याच गावांची वस्तुस्थिती आपण नाकारू शकत नाही. असे गावचे राजकीय, अराजकीय चित्र पाहताना मनात नक्कीच विचार येतो कि आपण कोणत्या दिशेने चालतोय असा प्रश्न पडतो.

समाज घडवण्यासाठी लागणारे विचार, शिक्षण आणि प्रकृती अर्थात निसर्ग असे तीन शास्वत स्तंभ म्हणावे लागतील. गावातील राजकारण जेथे संपते तेथे “आमचे बळ आमची एकी, अजूनी बरेच काम बाकी ” अशी भावना मनाशी बाळगून चिंचणी हे पंढरपूर तालुक्यातील छोटंसं गाव उभा राहतं आहे. अशा प्रकारे स्वतःशीच स्पर्धा करणारी, विकासकामे करणारी किती गावे आहेत? असा प्रश्न निश्चितच पडतो. गावात समृद्धी, विकास नांदावायचा असेल तर गावकऱ्यांची एकी, त्यांचे विचार खूप महत्वाची भूमिका साकारतात.

म. गांधीच्या मनातल्या अशाच परिपूर्ण गावांची सध्या गरज आहे. छोट्याश्या आणि पुनर्वसन चिंचणीकडे पाहताच अब्दुल कालामांच्या स्वप्नातला महासत्ता भारताचे चित्र डोळ्यासमोर उभा राहते. आणि स्वयंपूर्णतेचा आशेचा किरण दिसतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबांचा, महात्मा गांधीचा संदेश आपल्या कृतीतून चिंचणी या गावाने सार्थकी ठरवला आहे. झाडांच्या गर्द हिरवाईत गाव बसलेलं असलं तरी निसर्ग, परिसर, स्वयंपूर्णता आणि त्याच बरोबर समताधिष्ठित उभारणी या गावात पावलोपावली दिसते.


हेच गांधींच्या स्वप्नातील नव्या भारताचे चित्र असावे. चिंचणीतील शाळा तर नक्कीच विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासूपणाची भावना जागी करतीय. बाजूला असलेली अभ्यासिका आणि वडाचे भले मोठे झाड, त्याच्या शेजारी अद्ययावत अशी कर्मवीर भाऊराव पाटील अभ्यासिका कर्मवीर अण्णांची आठवण करून देते. चिंचणीत आलेला प्रत्येकजन जणू…. “आण्णा, तुमचा शिक्षण आणि समाज सुधारणेचा वड आता खोलवर रुजलाय आणि उंच आभाळाशी भिडलाय” असे सांगत असावा.आणि पारावरच्या शाळेत बसून अण्णांशी जणू सवांदच साधतोय असे जाणवते.

“अण्णा , शेताच्या कामाच्या भार सांभाळत बाहेरूनच शाळा पाहणारी तुमची पोरं.., आता शाळेत जाताहेत. तुम्ही लावलेल्या वडाच्या झाडाखाली अभ्यास करताहेत. विद्येची गंगा आता जोमाने वाहू लागली आहे. शिक्षितांच्या आणि अडाणी लोकांच्यामधलं अंतर आता तुमच्या पोरांनी कापलं आहे. ती डॉक्टर, इंजिनीअर, कलेक्टर बनताहेत. अण्णा, तुम्ही दिलेला शिवधनुष्य ‘चिंचणी’ने अगदी सर्वोतोपरी ताकदीनं पेलला आहे!” अशा स्वरूपाची समृद्ध, सर्वांगीण विकसित, पर्यावरण, शिक्षण, सामाजिक ऐक्य, जलसंवर्धन, पुरोगामीत्व या विविध अंगांनी चिंचणी हे गाव बहरले आहे.

मी काल पहिल्यांदाच गावात गेलो आणि गावच्या प्रेमात पडलो. तुम्ही सुद्धा एकवेळ जाऊन या, पंढरपुर तालुक्यातील माळावर उभा राहिलेलं प्रति महाबळेश्वर, गांधींच्या, गाडगेबाबा आणि तुकडोजी बाबांच्या संकल्पेनेतील आदर्श गाव पाहून या.

  • गणेश बाळकृष्ण आटकळे.
  • लेखक सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत

Leave a Reply

error: Content is protected !!