वारकऱ्यांच्या लाभाच्या घोषणा आणि अंमलबजावणी : सत्तेतील भाजप आणि राष्ट्रवादी ठरले निष्प्रभ
पंढरपूर : eagle eye news
नुकत्याच संपन्न झालेल्या आषाढी यात्रेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला प्रभाव सोडला आहे. शासक म्हणून, प्रशासनाच्या माध्यमातून आणि शिवसेना या पक्ष संघटनेच्या माध्यमातूनही आषाढी यात्रेत एकनाथ शिंदे यांची हवा दिसून आली. तुलनेने भाजपा यात्रेत दुय्यम राहिली आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस तर यात कुठेच दिसली नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वारकऱ्यांच्या मनात अल्पशी का असेना जागा निर्माण करण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यशस्वी ठरल्याचे दिसून येत आहे.
युगे २८ विटेवर उभा असलेला विठोबा म्हणजे महाराष्ट्राचे हृदय, वारकरी संप्रदाय महाराष्ट्राची रक्तवाहिनी आणि आषाढी यात्रा महाराष्ट्राचा सर्वोच्च सांस्कृतिक सोहळा मानला जातो. आजवर कोणत्याही नेत्याला विठोबा, वारकरी संप्रदाय आणि आषाढी यात्रेचा राजकीय वापर करता आलेला नाही, वारकरी संप्रदायाचा राजकीय फायदा कोणत्याही नेत्याला घेता आलेला नाही. याउलट वारकऱ्यांनी राजकारणाला नेहमी आपल्या प्रवाहापासून दूर ठेवले आहे. आषाढी एकादशीला शासकीय महापूजेसाठी येणाऱ्या मुख्यमंत्र्यांची चर्चा यात्राकाळात होत असते, परंतु यात्रेवर आणि सामान्य वारकऱ्यांवर छाप सोडण्यात कोणत्याही पक्षाला आणि मुख्यमंत्र्यास शक्य झालेले नाही.
यात्रेपूर्वी पंढरपुरात जाऊन नियोजनाची पाहणी करणारे पहिले मुख्यमंत्री
मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची हि आषाढीची तिसरी शासकीय महापूजा होती. विशेष म्हणजे मागीलवर्षी आणि यंदाही मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी बारकाईने लक्ष दिलेले आहे. वारीच्या नियोजनात कुठेही कमी राहू नये, वारकऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा मिळतील यासाठी त्यांच्या एवढे कोणताही मुख्यमंत्री सजग दिसलेला नाही. आषाढी यात्रेचे नियोजन आजवर पालकमंत्री किंवा विभागीय आयुक्त पातळीवरील प्रशासक पाहत होते. मात्र गेल्या दोन वर्षात थेट वर्षा बंगल्यावरून यात्रेच्या नियोजनाची आखणी केली जाऊ लागली. यात्रेच्या पूर्वीचा थेट मुख्यमंत्री पंढरीत येऊन प्रत्यक्ष ग्राउंडवर जाऊन यात्रा कामाची पाहणी करू लागले. याचा परिणाम यात्रेचे नियोजन नेटके होऊ लागले.
वारकऱ्यांच्या लाभाच्या घोषणा आणि प्रभावी अमलबजावणी
नगरपालिका, ग्रामपंचायतींसह यात्राकामी शासकीय विभागांना निधी वाढवून देणे असो, दिंड्यांना २० हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय असो, ४० वारकरी असतील तर राज्याच्या कोनत्याही गावात एस टी बस उपलब्ध करून देणे असो अशा अनेक लोकप्रिय घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्या आणि त्यांची अंमलबजावणी सुद्धा दिसून आली. आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून आकारास आलेला महाआरोग्य शिबिरासारखा उपक्रम वारकऱ्यांना दिलासा देणारा तर ठरलाच परंतु वारीच्या आरोग्याची काळजी घेणारा उपक्रम ठरला आहे. . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व्यक्तिगत खर्चातून अन्नदान करण्यात आले तसेच पाण्याच्या बाटल्याहि भाविकांना मोफत वाटण्यात आल्या. या सर्व उपक्रमांचा लाभ जास्तीत जास्त वारकऱ्यांना प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष मिळालेला आहे. त्यामुळे यात्रा काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची चर्चा ऐकायला मिळत होती.
शिंदे सेनेच्या स्थानिक शिलेदारांनी मैदान राखले
स्थानिक पातळीवर मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेचे संघटनात्मक बळ कमी असले तरीही शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. शिवाजी सावंत, उद्योजक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक शिवसैनिक राजू खरे, सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख महेश साठे यांनी स्थानिक पातळीवर भाविकांच्या सोयीचे अनेक उपक्रम राबवले. संपूर्ण पंढरपूर शहरात असंख्य डिजिटल फलकातून सर्वत्र मुख्यमंत्र्याचाच प्रभाव दिसून आला. काम करण्यात आणि करीत आहोत हे दाखवून देण्यात हि शिंदे समर्थक कमी पडले नाहीत. एकूणच स्थानिक पातळीवर शिंदे सेनेची ताकद तोकडी असतानाही स्थानिक शिलेदारांनी आपापल्या परीने प्रयत्न करून मैदान राखल्याचे दिसून आले.
वारकरी केंद्रित नवीन घोषणा : राजर्षी शाहू महाराज मराठा भवनाचे भूमिपूजन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यात्रेच्या दरम्यान वारकरी महामंडळाची घोषणा केली, विठ्ठल दर्शनासाठी तिरुपती बालाजी टोकण दर्शनची व्यवस्था पंढरपुरात उभी करण्यासाठी १०३ कोटी रुपयांच्या निधीचीही घोषणा केली. त्याचवेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज मराठा भावनांचे भूमिपूजन केले. या भवनासाठी ५ कोटी मंजूर असताना आणखी १० कोटी रुपये देण्याचीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. त्यामुळे स्थानिक मराठा समाजातून या घोषणेचे जोरदार स्वागत होत आहे.
भाजप निष्प्रभ : पालकमंत्र्यांचा यात्रेतील सहभाग नगण्य : गिरीश महाजनांना टेहळणी टॉवरवर चढावे लागले
जिल्ह्याचे पालकमंत्री भाजपचे आहेत, स्थानिक आमदार भाजपचे आहेत, शिवाय परिचारक यांच्यासारखे स्थानिक संघटनात्मक ताकद असणारे भाजप नेते असूनही यात्रा काळात भाजप अगदी दुय्यम स्थानी दिसून आली. पालकमंत्र्यांचा यात्रा नियोजनातील सहभाग अगदीच दुर्लक्षित असा होता. यात्रेवर एकनाथ शिंदे यांचाच प्रभाव असल्याचे लक्षात येताच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन याना चर्चेत राहण्यासाठी पोलिसांच्या टेहळणी टॉवरवर चढून गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे काम दाखवावे लागले. यात्रेत फिरून भाविकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करावा लागला.