पंढरपूर तालुक्यातील 22 गावात पोहोचला कोरोना

232 कोरोना पॉझिटिव्ह केसेस

पंढरपूर : ईगल आय मीडिया

हजारो किलोमीटर दूर चीन, अमेरिकेमध्ये असल्याने कोरोना आपल्यापर्यंत येणार नाही, या भ्रमात असलेल्या पंढरपूर शहर व तालुक्यातील नागरिकांना कोरोना विषाणूने हवालदिल करून सोडले आहे. नाही – नाही म्हणत कोरोना विषाणू पंढरपूर तालुक्याच्या 22 गावांमध्ये पोहोचला आहे. दररोज नवीन गावांमध्ये, नवीन कोरोना रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे नागरिकांनी आणखी काळजी न घेतल्यास, मेड इन चायना विषाणू पंढरपूर तालुक्याच्या प्रत्येक गावात आणि घरा-घरातसुद्धा पोहोचू शकतो अशी भीती व्यक्त होत आहे.

2019 अखेरीस डिसेंबर दरम्यान चीनमध्ये कोरोना विषाणूचे थैमान सुरू असल्याचे पंढरपूर तालुक्यातील नागरिक वर्तमानपत्रातून वाचत होते आणि टीव्हीवर पाहत होते. हा रोग भारतात येईल, भारतातून आपल्या जिल्ह्यात, आणि तालुक्यात येईल अशी शक्यताही त्यावेळी कोणी व्यक्त केली नव्हती. परंतु केवळ सहा महिन्यातच कोरोना विषाणूने पंढरपूर तालुक्यात पाऊल ठेवले आणि तब्बल 22 गावांमध्ये शिरकाव केलेला आहे.

यामध्ये गोपाळपूर, वाखरी, करकम्ब, भोसे, शेगाव दु, भटुंबरे, देगाव, सरकोली, एकलासपूर, लक्ष्मीटाकळी, बोहाळी, भंडीशेगाव, रोपळे, गुरसाळे, व्होळे, कान्हापुरी, बार्डी, उपरी, नारायण चिंचोली, ईश्वर वठार, पुळुज, तारापूर आदी गावांचा समावेश आहे.


तर पंढरपूर शहरातही प्रत्येक गल्लीत, प्रत्येक उपनगरात कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण सापडू लागले आहेत. त्यामुळेच शहर व तालुक्यात तब्बल 232 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.

ग्रामीण भागात कोरोना प्रभाव वाढत असल्यामुळे ग्रामीण जनजीवनसुद्धा विस्कळीत होत असल्याचे दिसत आहे. यापुढच्या काळात कोरोनासोबत जगावे लागेल,अशी खूणगाठ मनाशी बांधून ग्रामीण भागातील नागरिक आपल्या सवयी बदलू लागल्याचे चित्र दिसत आहे. त्याचबरोबर प्रशासनानेही नागरिकांना सतर्क केले असून गावोगावी स्थापन केलेल्या ग्राम समित्या कोरोनाचा शिरकाव थोपवण्यासाठी प्रयत्न करू लागल्या आहेत. पुढचे आणखी काही महिने तरी प्रादुर्भाव कायम राहील असेही बोलले जात असून, ज्या गावात कोरोना पोहोचलेला नाही, तेथील ग्रामस्थांनी तो गावात येऊ नये यासाठीही प्रयत्न चालवल्याचे दिसत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!