महुद ( ता. सांगोला ) येथील घटना , सक्तीने पाठवले आईसोलेशन सेंटरला
सांगोला : ईगल आय मीडिया
स्वतः पेशाने डॉक्टर असलेली व्यक्ती उपचारानंतर घरी परतली. जागतिक महामारीवर मात करून ‘आपलं माणूस ‘ घरी आल्याचा आनंदात कुटुंबीयांनी औक्षण करून स्वागत केले. गल्लीतील लोकांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला. मात्र नंतर जेव्हा वस्तुस्थिती समजली तेव्हा सर्वांनी प्रश्न केला , डॉक्टर तुम्ही सुद्धा ? मग काय ग्राम समितीने सक्तीने डॉक्टरना आईसोलेशन सेंटरला पाठवले. मात्र यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. तसेच स्वतः डॉक्टर असणाऱ्या व्यक्तीच्या बेफिकिरीबद्दल तक्रारीचा सूर निघू लागला आहे.
महूद ( ता.सांगोला ) येथील व्यवसायाने डॉक्टर असणारी 38 वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित आहे. या डॉक्टरवर 21 जुलै पासून मिरज येथे उपचार सुरू होते. मात्र गावातील कोणत्याही प्रशासकीय विभागाला माहिती न देता हा डॉक्टर परस्पर महूद येथे घरी येऊन राहिल.
येथील मुख्य चौकालगत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरच्या संपर्कातील कंपाउंडर व एक रुग्ण हे कोरोना बाधित आढळले आहेत. या दोघांच्या संपर्कातील इतर व्यक्तींचा शोध तपासणी घेण्याचे काम चालू असतानाच हे डॉक्टर रविवारी सायंकाळी गावातील कोणत्याही शासकीय यंत्रणेला ग्राम समितीला कल्पना न देता आपल्या घरी आले.
त्या भागातल्या नागरिकांनी डॉक्टर कोरोना मुक्त झाल्याचे समजून टाळ्या वाजवून तर कुटुंबीयांनी औक्षण करून स्वागत केले. या जंगी स्वागताचा व्हिडीओ सुद्धा काढला आणि तो सोशल मीडियावर फिरायला लागला.रात्री उशिरा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ग्राम समितीच्या सदस्यांनी डॉक्टरांशी संपर्क साधला. आपण कोरोना मुक्त झाला आहात का याची विचारणा केली. त्यावर डॉक्टरांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. तुम्ही यामध्ये पडू नका, मी आणि येथील वैद्यकीय अधिकारी पाहून घेतो असेही त्यांना ऐकवले. गावचे पोलीस पाटील प्रभाकर कांबळे यांनी डॉक्टरचा पिच्छा पुरवला आणि त्यांचा वैद्यकीय अहवाल मागवून घेतला. डॉक्टरांनी पाठवलेला त्यांचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटिव्ह होता.
यानंतर सोमवार ( दि 27 जुलै) रोजी ग्रामकृती समितीने तहसीलदार,गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी,पोलीस निरीक्षक यांच्याकडे रितसर अहवाल पाठवला. तलाठी, मंडलाधिकारी,ग्रामविकास अधिकारी, पोलीस पाटील यांनी डॉक्टरांच्या घरी जाऊन त्यांना तात्काळ उपचारासाठी विलगिकरन सेंटरमध्ये दाखल व्हावे असे सांगितले. तरीही डॉक्टर ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. सोमवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत हा गोंधळ सुरू होता.शेवटी सायंकाळी सहा वाजता रुग्णवाहिके मधून डॉक्टरांना कमलापूर येथील विलगीकरण कक्षात पाठवण्यात आले.