देशात झालेल्या जगातील मोठ्या सर्व्हेक्षणातील निष्कर्ष
टीम : ईगल आय मीडिया
देशातील सशस्त्र दलांच्या 15 लाख 90 हजार पेक्षा अधिक आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सवर झालेल्या अभ्यासात कोवीशील्डचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांमध्ये कोरोना संसर्ग 93% कमी झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कोवीशील्ड लस घेणाऱ्यांना कोरोनाचा धोका 93% कमी झाला आहे. चंदिगडच्या पीजीआय येथे आर्म्ड फोर्सेज मेडिकल कॉलेज (AFMC) ने अभ्यास केला आहे. या अभ्यासाला विन-विन कोहोर्ट असे नाव दिले. तसेच हे जर्नल ‘द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन मध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.
नीति आयोगाचे सदस्य डॉक्टर व्ही के पॉल यांनी या अभ्यासावर बोलताना सांगितले, की “हा अभ्यास 15 लाखांपेक्षा अधिक डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसह फ्रंटलाइन वर्कर्सवर करण्यात आला आहे. ज्यांनी कोवीशील्डचे दोन डोस घेतले त्यातील 93% लोकांना कोरोनाच्या विरोधात संरक्षण मिळाले आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा उद्रेक सुरू असताना हा अभ्यास करण्यात आला.”
भारतात कोरोनावर लसीकरणाची सुरुवात 16 जानेवारी रोजी करण्यात आली. हा अभ्यास 30 मे पर्यंत दोन्ही डोस घेतलेल्या 15 लाख 90 हजार लोकांवर करण्यात आला आहे. या अभ्यासात एकूणच 15,95,630 लोकांपाईक 99% पुरुष होते. 135 दिवस चाललेल्या या अभ्यासात समाविष्ट करण्यात आलेल्यांपैकी 82.2% लोकांनी दोन्ही डोस घेतले होते. ब्रेक-थ्रू इन्फेक्शनवर झालेल्या देशातील अभ्यासानुसार, देशात व्हॅक्सीनेशन झाल्यानंतर कोरोना होण्याचे प्रमाण केवळ 1.6% आहे.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने तामिळनाडू पोलिस विभाग, ICMR-नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजी आणि ख्रिश्चन मेडिकल कॉलेज, वेल्लोर यांच्यामार्फत करण्यात आलेला अभ्यासानुसार, लसीचा सिंगल डोस घेतल्यास तो कोरोनावर 82% पर्यंत प्रभावी ठरू शकतो. दोन्ही डोस घेतल्यास कोरोनापासून 95% संरक्षण मिळते.
अभ्यासातील सहाय्यक लेखक आणि आर्म्ड फोर्सेज मेडिकल सर्विसेजचे महासंचालक रजत दत्ता यांच्या मते, अभ्यासातील निकालांवरून कोरोना लस किती प्रभावी आहेत हे स्पष्ट होत आहे. यामुळे लसींवर असलेल्या लोकांच्या शंका दूर करण्यात निश्चितच मदत होईल. तर, नीति आयोगाचे सदस्य डॉक्टर व्ही के पॉल यांनी सांगितल्याप्रमाणे, कोरोना विरोधात लढण्याचा एकमेव शस्त्र लसीकरण आहे. पण, यातून कोरोना होणारच नाही असे नाही. त्यामुळे, लसीकरण झाल्यानंतरही कोरोना काळातील निर्धारित नियमांचे पालन करा, असे आवाहन त्यांनी केले.