अजित पवार, जयंत पाटील उद्या पंढरपूर दौऱ्यावर

गटबाजीवर उतारा आणि निवडणुकीची मोर्चेबांधणी करणार

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील रविवारी पंढरपूरच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून नुकतीच उफाळून आलेली गटबाजी शमवण्याचा प्रयत्न करणार आहेत. तसेच पोटनिवडणूकीतील उमेदवारी आणि मोर्चेबांधणी बाबत ही कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. मात्र उद्याच राष्ट्रवादी ची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता नसल्याचे समजते.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाली असून 23 मार्च पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस ची उमेदवारी कुणाला मिळते याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे. सध्या तरी भगीरथ भालके यांनाच उमेदवारी मिळेल अशी चर्चा सुरू आहे.

मात्र पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी भगीरथ भालके यांना विरोध केला असून श्रीमती जयश्रीताई भालके यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करून, पक्षात उफाळलेली गटबाजी दूर करण्याच्या हेतूने रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील स्वतः पंढरपूर दौऱ्यावर येणार आहेत.

यावेळी ते सर्व कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन उमेदवारी बाबत ही कानोसा घेतील असे समजते. मात्र उद्याच उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता धूसर आहे. सध्या तरी उपमुख्यमंत्री पवार आणि ना.पाटील यांच्या दौऱ्याकडे कार्यकर्त्यांचे आणि मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!