1700 तारखा, 25 जिल्हा न्यायाधीशांची बदली : 8 वेळा अंतिम सुनावणी
भरतपूरचे राजा मानसिंग यांच्या हत्याकांडाची अजब स्टोरी
टीम : ईगल आय मीडिया
भारतात नकली एन्काऊंटर हा प्रकार आता नवीन राहिलेला नाही. नुकताच विकास दुबे याचा खात्मा देशभर चर्चेत आला होता. ही चर्चा अजून थांबलेली नाही. त्याच दरम्यान 35 वर्षांपूर्वी देशातील एका संस्थानच्या राजाचेच नकली एन्काऊंटर करून हत्या करण्यात आलेल्या खटल्याचा निकाल मंगळवारी लागला. 11 पोलीस कर्मचारी दोषी ठरवून त्यांना जन्मठेपेची शिक्षा जिल्हा न्यायालयाने सुनावली. राजस्थान सह संपूर्ण भारतात 1985 सालानंतर अनेक वर्षे गाजत राहिलेल्या, मुख्यमंत्र्यांना आपली खुर्ची गमवाव्या लागलेल्या राजा मानसिंग हत्याकांडाची ही खास स्टोरी.
भरतपूर संस्थानचे राजा राजा मानसिंग यांचा जन्म 1921 साली झाला होता. त्यांनी इंग्लंडमध्ये इंजिनीअरिंगची पदवी घेतली होती आणि काही वर्षे इंग्रज सैन्यात सेकंड लेफ्टनंट नोकरी केली होती. स्वाभिमानी राजा मानसिंग यांचा तिथे इंग्रज अधिकाऱ्यांशी वाद झाल्यानंतर त्यांनी इंग्रज सेना सोडली.
स्वातंत्र्यानंतर मानसिंह यांनी राजकारणात पदार्पण केले. अपक्ष आमदार म्हणून डीग विधानसभा मतदारसंघातून ते 1952 ते 1984 या दरम्यान सलग 7 वेळा निवडून आले. जेपी आणि इंदिरा लाटेतही राजा मानसिंग अपक्ष निवडून आले होते. त्यांच्या विरोधात काँग्रेस पक्ष कधीच उमेदवार उभा करत नव्हता. आणि त्या मतदारसंघात पक्षाचे बडे नेते प्रचारासाठी जात ही नव्हते. जणू काही हा अलिखित करारच होता.
मात्र राजस्थानचे तत्कालीन मुख्यमंत्री शिवचरण माथूर यांनी 1985 साली डीग विधानसभा प्रतिष्ठेची केली आणि राजा मानसिंग यांच्या विरोधात सेवानिवृत्त आयएएस अधिकारी विजेंद्र सिंह यांना काँग्रेसची उमेदवारी दिली. एवढेच नाही तर प्रथमच राज्याचे डीग मध्ये प्रचारासाठी गेले. मुख्यमंत्री माथूर हेलिकॉप्टरने गेले, मात्र राजा मानसिंग यांनी मुख्यमंत्र्याच्या सभेपूर्वी सभेचा मंच काढून टाकला, जीप घेऊन हेलिपॅडवर गेले आणि मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला जीप ( जोगा ) धडका दिल्या. यामुळे हेलिकॉप्टर नादुरुस्त झाल्याने मुख्यमंत्र्याला वाहनातून जयपूरला जावे लागले.
राजा मानसिंग यांनी थेट सरकारला आव्हान दिले होते त्यामुळे भरतपूर येथे कर्फ्यु लावला होता. 21 फेब्रुवारी रोजी राजा मानसिंग घरातून बाहेर पडले त्यांना लोकांनी कर्फ्यु आहे आणि जाऊ नका असे सांगितले होते तरीही आपल्याच संस्थानात फिरण्याची कसली भीती म्हणून ते बाहेर पडले. त्यांच्या कुटुंबीयांनी राजा मानसिंग हे पोलिसांना शरण जाण्याच्या हेतूने गेले होते असे सांगितले.
राजा मानसिंग जीप घेऊन गेली भाजी मार्केटमध्ये आले असता पोलिसांनी त्यांना अडवले आणि त्यावेळी फायरिंग झाली. यामध्ये राजा मानसिंग आणि त्यांचे सहकारी सुमेर सिंह आणि हरी सिंह यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
राजा मानसिंग यांचे जावई विजय सिंह यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह 18 लोकांच्या विरोधात फिर्याद दिली. या घटनेनंतर भरतपूरमध्ये दंगल पेटली, घटनेच्या दोन दिवसानंतर मुख्यमंत्र्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. या घटनेची चौकशी सीबीआयकडे सोपवली गेली.
या नकली एन्काऊंटर सुनावणीसाठी 1700 तारखा पडल्या, 25 जिल्हा न्यायाधीश बदलून गेले. 8 वेळा अंतिम सुनावणी झाली. पस्तीस वर्षे चाललेला खटला शेवटी मंगळवार 21 जुलै 2020 रोजी निकालात निघाला. मथुरा जिल्हा न्यायालयाने अंतिम निकाल देत नकली एंकौंटर मध्ये पूर्व डीएसपी 11 पोलीसाना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा दिली. त्यापैकी तीन आरोपीचा यापूर्वी मृत्यू झालेला आहे. स्वतंत्र भारतात एखाद्या संस्थांनच्या राजाचे झालेले हे एकमेव नकली एंकौंटर आहे.
राजा मानसिंग यांची मुलगी कृष्णेंद्र कौर उर्फ दीपा सिंह 1990 साली खासदार झाल्या, पुढे भाजपच्या वसुंधरा राजे सरकारमध्ये मंत्री होत्या तर त्यांचे पुतणे विश्वेन्द्रसिंह हे भाजपमधून कॉंग्रेसमध्ये गेले आणि आमदार झाले. सचिन पायलट समर्थक म्हणून गेहलोत सरकार पडण्याचा प्रयत्न केला म्हणून काँग्रेस ने त्यांना पक्षातून काढलं आहे.
देशातील एका संस्थानिक राजाचे हत्याकांड होऊनही त्याचा खटला तब्बल 35 वर्षे चालला. हे भारतीय न्याय व्यवस्थेच्या कूर्मगतीचे ज्वलंत उदाहरण आहे.
खूप मोठी आणि महत्वाई नॅशनल न्यूज आमच्या पर्यंत पोहोचविल्याबद्दल ईगल आयचे आभार.
खरोखरच न्याय देण्यास उशीर म्हणजे अन्याय करण्यासारखेच आहे. ही व्यवस्था बदलायला हवी. किमान निकाल योग्यवेळी दिले जावेत.
thanks
एक महत्त्वाची आणि मोठी नॅशनल न्यूज आमच्या पर्यंत पोहोचविल्याबद्दल इगल आयचे आभार.
खरोखर न्याय देण्यास उशीर म्हणजे अन्याय करण्यासारखेच आहे. ही व्यवस्था बदलायला हवी. किमानन निकाल वेळेत दिले जावेत.