एफ आर पीसाठी सर्व शेतकरी संघटनांचे पदाधिकारी एकत्र


२३ ऑक्टोबर रोजी सर्व संघटनांची ऊस परिषद होणार

पंढरपूर : ईगल आय न्यूज


 पंढरपूर तालुक्यातील ऊस उत्पादकांना वाढीव एफ आर पी दिली जावी यासाठी पंढरपूरमध्ये ऊस परिषद आयोजित केली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात प्रथमच सर्व शेतकरी संघटनांचे आघाडीचे शिलेदार हातात हात घालून एकत्र आले आहेत आणि ऊस दरासाठी आंदोलन उभा करण्याच्या हेतूने गावो गावी घोंगडी बैठका घेत आहेत. या बैठकांचे फलित काय आणि या सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या एकत्र येण्यामुळे  शेतकरी या  संघटनांवर पुन्हा विश्वास ठेवणार का याकडे लक्ष लागले आहे.

ऊस दर आंदोलनावरून १० वर्षांपूर्वी साखर सम्राटांना सळो कि पळो करून सोडणाऱ्या शेतकरी संघटनांना मागील काही वर्षांत मरगळ आली आहे. राजकीय सत्तेचा हव्यास, काही पदाधिकाऱ्यांनी चळवळीचे केलेले बाजारीकरण आणि साखर कारखानदारांशी तत्वहीन तडजोडी यामुळे  सर्वच शेतकरी संघटनांनी शेतकऱ्यांचा विश्वास गमावला आहे.

त्याचा फटका या संघटनाना बसला तसाच शेतकऱ्यांनाही बसला असून वर्ष, दोन वर्षे ऊस बिलाची एफ आर पी सुद्धा अनेक कारखानदार देईनासे झाले आहेत. काटा मारी आणि रिकव्हरी चोरीचे आरोपही होऊ लागले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी संघटना, बळीराजा शेतकरी संघटना अशा अनेक शेतकरी संघटना जिल्ह्यात काम करीत आहेत. मात्र मागील १० वर्षात या संघटनांना मरगळ आली आहे.  

शेतकऱ्यांचा विश्वास गमावलेल्या या  संघटनांनी पुन्हा एकदा आंदोलन उभा करण्याचा प्रयन्त सुरु केला आहे. मात्र आपापल्या संघटनांचे झेंडे बाजूला ठेऊन या संघटनाचे पदाधिकारी एकत्र आहे आहेत. त्यांनी उस दर संघर्ष समिती स्थापन केली असून त्यामाध्यमातून संघटनांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी  २३ ऑक्टोबर रोजी पंढरपूर मध्ये ऊस परिषद आयोजित केली आहे. विशेष म्हणजे  छत्रपती शिवाजी महाराज चौकात होणाऱ्या या ऊस परिषदेस जिल्ह्याबाहेरील एकाही शेतकरी नेत्याला बोलावलेले नाही.  

वाढीव उत्पादन खर्च लक्षात घेऊन उसाला सांगली, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्याप्रमाणे एफ आर पी दिली जावी, रिकव्हरी आणि ऊस वजन काटा  या संदर्भात पारदर्शकता असावी अशा मागण्या घेऊन हि ऊस परिषद आयोजित केलेली आहे.


या निमित्ताने तब्बल १० वर्षांनी सर्व शेतकरी संघटनांचे पदाधिकारी एकत्र येऊन शेतकऱ्यांना जागृत करण्यासाठी गावोगावी फिरत आहेत. मागील दोन दिवसात २२ गावांत जाऊन घोंगडी बैठका घेण्यात आल्या आहेत. पुढील ४ दिवसात आणखी ३० ते ४० गावात शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन तालुक्यात पुन्हा एकदा ऊस दर आंदोलन उभा करण्याचा निर्धार या ऊस दर संघर्ष समितीने व्यक्त केला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!