शेतकरी संघटना कमजोर : शेतकरी उदासीन

जिल्ह्यातील साखर कारखानदार बिनधास्त : गाळप हंगाम जोमात

पंढरपूर : ईगल आय मीडिया

एके काळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रभावामुळे दबावात असलेले साखर कारखानदार, स्वाभिमानीतील फाटा फुटीमुळे आता बिनधास्त झालेले आहेत. त्यातच जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी आपल्याच हक्काबाबत उदासीन असल्याने ऊस दराचे आंदोलन ताकदीने उभा राहत नाही असे चित्र निर्माण झाले आहे.

सोलापूर जिल्हा हा साखर उद्योगाचा जिल्हा आहे, जिल्ह्यात 70 ते 80 लाख टनापेक्षा अधिक ऊस उत्पादन होते आणि 30 हुन अधिक साखर कारखाने उभा आहेत. जिल्ह्यातील साखर कारखानदारांची एकजूट ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे शोषण करीत होती. मात्र खा राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साखर कारखानदारांना सळो की पळो सोडले आणि आंदोलनाच्या जोरावर शेतकऱ्यांना किफायतशीर ऊस दर मिळवून देण्याची प्रथा सुरू केली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 2500 रुपये देण्याची मागणी करीत ऊस दराचे आंदोलन उभा केले आहे मात्र शेतकऱ्यांचा त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे ऊस दर जाहीर न करताच जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू आहेत. पुणे, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातील कारखान्यांनी frp आणि त्याहून अधिक दर जाहीर केला असला तरी जिल्ह्यातील साखर कारखानदार frp चेही तुकडे करून अत्यल्प रक्कम देण्याच्या गोष्टी करीत आहेत. 2 ते 3 लाख टन गाळप केलेल्या साखर कारखान्यांनी अजूनही पहिली उचल किती देणार ते जाहीर केलेले नाही. शेतकरी संघटनांमध्ये ताकद उरल्याचे दिसत नाही. शेतकऱ्यांनी पाठिंबा दिल्या शिवाय प्रभावी आंदोलन उभा राहू शकत नाही.

मात्र जिल्ह्यात ऊस दराची चळवळ आणि राजकीयदृष्ट्या प्रभावी ठरलेल्या स्वाभिमानीत राजकारणामुळे फूट पडली आणि संघटना निष्प्रभ ठरत गेली. पुढे इतरही नावाने शेतकरी संघटना उभा राहिल्या मात्र एकही संघटना प्रभावी राहिलेली नाही. एके काळी संघटनेच्या पुढे गुडघे टेकलेल्या आणि ऊस दराची कोंडी फुटावी म्हणून धडपड करणाऱ्या साखर कारखानदारांनी आता मनमानी सुरू केली आहे. कायद्यानुसार एकरकमी frp देने राहिले बाजूला, अनेकांनी दोन, तीन वर्षांची frp दिलेली नाही तरीसुद्धा कारखाने सुरू झाले आणि गाळप हंगामही जोमात चालू आहे.

एरवी नेते ‘टार्गेट’करून आंदोलनाचे फार्स करणारे ‘तडजोड बहाद्दर’ पदाधिकारी ऊस दराच्या आंदोलनाची गरज असताना बाहेर पडायला तयार नाहीत. जे बाहेर आलेत ते आपले अस्तित्व दाखवून देण्यासाठी, आपली वसुली चालू रहावी, चमकोगिरीसाठी आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एकूणच जिल्ह्यातील शेतकरी संघटना निष्प्रभ, तर शेतकरी आपल्या हक्कांबाबत उदासीन झाल्याने साखर कारखानदार बिनधास्त होऊन उसासह मुळ्या ही चघळू लागले आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!