पांडुरंग परिवाराच्या अनेक नेत्यांचा गावातच झाला पराभव
पंढरपूर : ईगल आय मीडिया
तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीवर एकूणच आ.प्रशांत परिचारक प्रणित पांडुरंग परिवाराचे वर्चस्व दिसत असले तरीही अतिशय प्रतिकूल परिस्थितीत विठ्ठल परिवाराने पांडुरंग परिवारास निकराची झुंज दिल्याचे दिसून येते. पांडुरंग परिवाराच्या अनेक बड्या नेत्यांना पराभवाचे झटके बसले आहेत. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत पांडुरंग परिवारासमोर विठ्ठल परिवाराचे मोठे आव्हान असणार आहे निश्चित मानले जात आहे.
ग्रामपंचायत निवडणुका या गावपातळीवर, गट – तट, भावकी आणि सामाजिक समिकरनावर लढवली जाते. इथे नात्या गोत्यावर निवडणूक निकला बदलत असतात. त्यामुळे या निवडणुकाकडे राजकीय दृष्टीने पाहणे अनाठायी असते. तरीही तालुका पातळीवर असलेल्या नेत्यांचे समर्थक, त्यांचे गट आणि राजकीय प्रभाव निवडणुकीत निश्चितच स्पष्ट दिसून येतो. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूकित मिळालेल्या यशापयशाचे तालुक्यातील राजकारणावर काही अंशी परिणाम दिसून येतात.
यंदा तालुक्यातील 94 पैकी 72 ग्रामपंचायतींची निवडणूक झाली आहे. त्यापैकी जैनवाडी ही एकच ग्रामपंचायत बिनविरोध झाली होती. बाकी 71 ग्रामपंचायती पैकी बहुतांश ग्रामपंचायतीमध्ये परिचारक समर्थक मोठ्या संख्येने निवडुन आले आहेत. 20 पेक्षा अधिक ग्रामपंचायती परिचारक समर्थकांच्या पॅनेलने जिंकल्या आहेत. तर 10 पेक्षा जास्त ग्रामपंचायती विठ्ठल परिवाराने जिंकल्या आहेत. उर्वरित ग्रामपंचायतींमध्ये स्थानिक आघाड्या, आ.परिचारक -भालके – काळे यांच्या गटांनी केलेल्या आघाड्यानी जिंकल्या आहेत.
एकूण ग्रामपंचायत सदस्य संख्या विचारात घेतली तर पांडुरंग परिवाराचे सदस्य अधिक असल्याचे दिसते. त्यामुळे पांडुरंग परिवाराचे कार्यकर्ते सुखावले आहेत. मात्र विठ्ठल परिवाराने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत दिलेली लढत अनपेक्षित आहे. निवडणूकीपूर्वी आम. भारत भालके यांचे निधन झाले होते. त्यामुळे कार्यकर्ते सैरभैर होते. शिवाय माजी जि प सदस्य राजूबापू पाटील यांचे निधन धक्कादायक होते. त्यातच विठ्ठल सहकारी, चंद्रभागा सहकारी या साखर कारखान्याची आर्थिक अवस्था बिकट झालेली आहे. गाळप हंगाम विस्कळीत पणे सुरू आहे. त्यामुळे या दोन्ही सहकारी संस्थांचे सभासद, शेतकरी अस्वस्थ आहेत. तालुक्याचे अर्थकारण ही यामुळे बिघडले आहे. या पार्श्वभूमीवर विठ्ठल परिवाराच्या कार्यकर्त्यांमध्ये मरगळ, नैराश्य आलेले होते. शिवाय धीर आणि आधार देण्यासाठी सक्षम नेता पाठीशी नव्हता.
तरीही विठ्ठल परिवारातील काळे,भालके आणि पाटील गटाने ग्रामपंचायत निवडणुकीत लक्षणीय यश मिळवले आहे. विशेषतः मोठ्या ग्रामपंचायत मध्ये एक तर परिवर्तन घडवण्यात किंवा परिचारक गटासोबत आघाडी करून सत्तेत जाण्यात विठ्ठल परिवाराच्या कार्यकर्त्यांना यश मिळाले आहे. करकम्ब, भाळवणी, खर्डी, सुस्ते, पटवर्धन कुरोली, गादेगाव, गोपाळपूर, बाभूळगाव, वाखरी, चळे, सरकोली, भोसे, कासेगाव अशा मोठ्या गावात परिचारक गटाला एक तर पराभूत व्हावे लागले आहे नाही तर विठ्ठल परिवाराला सोबत घेऊन सत्ता टिकवावी लागली आहे.
कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे यांचा सुस्ते येथे पराभव झाला. जि प सदस्य बाळासाहेब देशमुख यांच्या करकम्ब मध्ये सलग दुसऱ्या वेळी पराभव झाला. पंचायत समितीचे माजी सभापती दिनकर नाईकनवरे यांच्या गावात त्यांचे पॅनल तिसऱ्या क्रमांकावर राहिले. कासेगाव, खर्डीमध्ये परिचारक गटांला विठ्ठल परिवाराला सोबत घेऊन निवडणूक लढवावी लागली. भाळवणी जि प गटाच्या सदस्या सौ. शोभा वाघमोडे यांच्या तिसंगी गावात विठ्ठल परिवाराचा झेंडा फडकला. गाडेगाव मध्ये पांडुरंग चे संचालक भीमराव फाटे यांना पराभूत व्हावे लागले. भाळवणी हा परिचारक गटाचा बालेकिल्ला असला तरी इथे आघाडी करून सत्ता टिकवावी लागली. याशिवाय गोपाळपूर, आंबे, रोपळे, चळे अशा गावात विठ्ठल परिवाराशी हात मिळवणी करूनच सत्ता मिळवावी लागली आहे. गाव पातळीवर निवडणूका स्थानिक आघाड्या आणि नात्या गोत्यावर होत असतात जे वास्तव असले तरीही परिचारक गट प्रथमच या निवडणुकीत बचावात्मक भूमिकेत दिसून आला. अडचणीत असलेल्या आणि गलितगात्र झालेल्या विठ्ठल परिवारावर निर्णायक मात करण्यात परिचारक गटाला यश मिळाले नाही. उलट परिवाराचे कार्यकर्ते मोठ्या निकराने लढले आणि समाधानकारक विजयाचे धनी ठरले.
आगामी जिल्हा पारिषद,पंचायत समितीची निवडणूक लक्षात घेता परिचारक गटाला विठ्ठल परिवाराचे आवाहन किरकोळीत मोजून चालता येणार नाही. विधानसभा पोटनिवडणुकीच्या दृष्टीने सुद्धा ग्रामपंचायत निवडणूक निकाल भालके गट आणि विठ्ठल परिवारास टॉनिक ठरणार आहेत असे दिसते.