15 मे पासून 22 लाख 50 हजार तळीरामांना घरपोच झाली दारू
मुंबई : ईगल आय मीडिया
लॉक डाऊनमुळे दारू मिळणे मुश्किल झाल्याने तडफडणाऱ्या तळीरामाना राज्यशासनाने मोठाच दिलासा दिला आहे. रस्त्यावर पिऊन पडू नयेत, कोरोनाच्या आजाराने पिडू नयेत या घोर काळजीपोटी 15 मे पासून राज्य सरकारने तळीरामाना घरपोहोच दारू दिली. आणि जेमतेम एकच महिन्यात तब्बल 22 लाख 50 हजार तळीरामांनी ” पिलें पिलें ओ मेरे राजा, पिलें पिलें ओ मेरे जानी ” म्हणत ऑनलाइन बुकिंग करून घरपोच मिळालेली दारू रिचवली आहे. याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने माहिती दिली असून शासनाला तळीरामांची मोठीच काळजी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात 23 मार्चपासून लॉक डाऊन जाहीर केला होता. त्यामुळे राज्यातील सर्वच सुमारे 10 हजार दुकाने बंद होती. महसूल वाढीच्या नावाखाली राज्य शासनाने 15 मे रोजी दुकाने खुली केली. आणि तळीरामांनी मोठ्या जल्लोषात दुकानासमोर रांगा लावून दारू रिचवली. राज्य शासनाने ऑनलाइन आणि ofline दारू पिण्याचे परवाने खुले केले. आणि बुकिंग केल्यास दारू घरपोहोच करण्याची सेवा सुरू केली. त्याचा ” लाभ ” घेत 22 लाख 50 हजार तळीरामांनी महिन्याभरात दारू घरपोहोच मिळवुन ती रिचवली आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी अशी की, 15 मे पासून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येत आहे. 15 मे ते 21 जून या काळात 22 लाख 50 हजार 023 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आली. आज दिवसभरात 66 हजार 570 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आली.
यापैकी मुंबई शहर आणि मुंबई उपनगरात 38 हजार 988 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.
मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर, राज्यात एकूण 10,791 किरकोळ मद्य विक्री दुकाने आहेत. त्यापैकी 8,222 अनुज्ञप्ती सुरू आहेत. राज्य शासनाने 3 मेपासून लॉकडाऊन कालावधीत सीलबंद मद्यविक्री सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहेत. राज्यात दि.15 मे पासून घरपोच मद्यविक्री योजना अंमलात आली असून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येतआहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने तयार केलेल्या संकेतस्थळावर ऑनलाईन मद्यसेवन परवाना प्राप्त करण्याचीसुविधा उपलब्ध आहे. 1 एप्रिल ते 17 जून या काळात 1 लाख 38 हजार 046 ग्राहकांनी मद्यसेवन परवाने मिळवण्यासाठी अर्ज केले होते. यापैकी 1 लाख 32 हजार 706 ग्राहकांना परवाने मंजूर करण्यात आले आहे.
100 रुपयात 1 वर्ष घ्या, तर 1000 रुपयात वर्षभर प्या !
ऑनलाईन मद्यसेवन परवाना घेतांना येत असलेल्या सर्व तांत्रिक अडचणींची सुधारणा करण्यात आली असून आता इच्छुक व्यक्ती संगणक, लॅपटॉप, अँड्रॉइड फोन, तसेच IOS प्रणालीव्दारे ऑनलाईन परवाने घेऊ शकतात. तसेच कोणालाऑनलाईन परवाना घ्यायाचा नसेल तर राज्य उत्पादन शुल्कविभागाच्या सर्व अधीक्षक , निरीक्षक, दुय्यम निरीक्षक कार्यालयात दररोज मद्यसेवन परवाने Offline पध्दतीनेसुध्दा उपलब्ध आहेत. सदर मद्यसेवन परवाने एक वर्षाकरीता शंभर रुपये किंवा आजीवन परवान्याकरीता एक हजार रुपये एवढे शुल्क देऊन परवाना मिळू शकतो.
दि.24 मार्चपासुन राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. महाराष्ट्र राज्यात शेजारील राज्यांमधुन होणारी अवैध मद्य तस्करी रोखण्यासाठी सर्व विभागीय उप आयुक्त तसेच संबंधित अधीक्षकांनी नाकाबंदी केली असुन 12 सीमा तपासणी नाक्यांवर विभागातीलअधिकारी, कर्मचारी तैनात आहेत. 20 जून रोजी राज्यात 63 गुन्हे नोंदविण्यात आले असून 29 आरोपींना अटक करण्यात आली असून 11 लाख 95 हजार रूपये किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
24 मार्चपासून 22 कोटींचा मुद्देमाल जप्त दि.24 मार्चपासुन दि.20 जून पर्यंत लॉकडाऊन काळात राज्यात एकूण 8,756 गुन्हे नोंदविण्यात आले असून 4,127 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 756 वाहने जप्त करण्यात आली असून 22 कोटी 22 लाख रुपये किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.