हळदी झाल्या, लग्न झाले, सुहागरातही झाली
टीम : ईगल आय मीडिया
आपल्या जन्म पत्रिकेतील मंगळ दूर करण्यासाठी पंजाबमधील एका शिकवणी वर्ग घेणाऱ्या शिक्षिकेने 13 वर्षीय विद्यार्थ्यांशी लग्न केले. हळदी, मेहंदी, सुहागरात असे विधी करून नंतर बांगड्या फोडून वैधव्य सुद्धा आले. मात्र जेव्हा ही गोष्ट मुलाच्या घरी समजली तेव्हा प्रकरण पोलिसात गेले.
पृथ्वीपासून लाखो किमी दूर असणारा मंगळ पत्रिकेत असणे खूप अशुभ मानले जाते. विशेषतः लग्न केल्यानंतर जोडीदार अल्पायुषी ठरतो अशी एक चुकीची कल्पना समाजात रूढ आहे. या मंगळ दोषापासून मुक्ती मिळावी म्हणून लोक मांत्रिकाकडे जातात. मांत्रिकाने सुचवलेले अजब उपाय करतात.
माजी जगतसुंदरी ऐश्वर्या राय हिच्या पत्रिकेत मंगळ होता म्हणून तिचाही अभिषेक बच्चन सोबत विवाह होण्यापूर्वी काही तास अगोदर पिंपळाच्या झाडासोबत विवाह लावल्याचे सांगितले जाते. यावरून उच्चभ्रू आणि उच्च शिक्षित लोकांमध्ये सुद्धा मंगळाची किती भीती आहे याची कल्पना येते.
असाच एक अजब प्रकार पंजाबच्या जालंधरमध्ये घडला आहे
एका खाजगी वर्ग घेणाऱ्या शिक्षिकेने तिच्या पत्रिकेतील ‘मंगळा’वर मात करण्यासाठी आपल्या १३ वर्षाच्या विद्यार्थ्यांशी लग्न केले. जालंधरच्या बस्ती बावा खेल भागात ही घटना घडली आहे.
शिक्षक आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांनी जबरदस्तीने हळदी-मेहंदी सोहळा आणि ‘सुहागरात’ विवाह विधी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. नंतर शिक्षिकेला तिच्या बांगड्या फोडून विधवा घोषित केले. सुचवलेले विधी पूर्ण करण्यासाठी कुटुंबीयांनी शोकसभेचे आयोजन देखील केले होते. पीडित मुलाच्या कुटुंबाने पोलिसांना सांगितले.
एका पुजार्याने सांगितलेल्या मांगलिक दोषामुळे तिचे लग्न होत नसल्यामुळे तिचे कुटुंब चिंतीत असल्याचे या महिलेने पोलिसांना सांगितले. या दोषातून किंवा कमतरतेपासून मुक्त होण्यासाठी तिला एका अल्पवयीन मुलाबरोबर प्रतीकात्मक लग्न करावे लागेल, असं एका पुजा-याने तिला सुचवले होते.
त्या महिलेच्या शिकवणी वर्गात शिकणाऱ्या १३ वर्षीय मुलाला वर म्हणून निवडले. शिकवणी शिक्षिकेने मुलाच्या आई-वडिलांना सांगितले की शिकवणीसाठी त्याला तिच्या घरी एक आठवडा राहणे आवश्यक आहे. जेव्हा मुलगा घरी परतला आणि त्याने कुटुंबाला ही घटना सांगितली तेव्हा ही बाब उघडकीस आली. पीडित मुलाच्या आई-वडिलांनी ही बाब तत्काळ बस्ती बावा खेल पोलिस स्टेशनला कळविली.