25 ऑगस्ट पासून कास पठार खुले

टीम : ईगल आय मीडिया

जागतिक वारसास्थळ म्हणून असलेल्या कास पठार यंदा 25 ऑगस्ट पासून पर्यटकांना खुले होणार आहे. काल ( दि.18 ) झालेल्या कास संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दररोज 3 हजार पर्यटकांना online बुकिंग करूनच प्रवेश दिला जाणार आहे. यंदा कास पठारावर रानफुलांचा रंगोत्सव सध्या सुरू झाला आहे. विविध फुलांच्या कळ्या उमलल्या असून पुढील 15 दिवसांत पठार विविध फुलांनी आणखीनच बहरणार आहे. जिल्हाधिकार्‍यांनी पर्यटनाला परवानगी दिल्यानंतर यंदा कासचा हंगाम दि.25 ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे. याबाबत काल बुधवारी बैठक झाली असून त्यामध्ये याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.

https://www.kas.ind.in

या लिंकवरून कास पठार भेटीचे बुकिंग करू शकता !


या फुलांचे होवू लागले दर्शन
कास पठारावर रानहळद, जंगली आले, सातारी तुरा(वायुतूरा), कपरू(बिगेनिया), आषाढ आमरी, कंदील पुष्प, सफेद मुसळी, नागफणी, रानतंबाखू, झाडावरील आर्किड, भुईचक्र, रानवांगी, रामटा, बिबळा आर्किड पांचगणी आमरी, स्पंद, चवर (पांढरी हळदी), निसुरडे, आभाळी, नभाळी, कुमुदिनी, दीपकाडी, सोनकी,गवेली अशी तुरळक फुलांचे दर्शन होवू लागले आहे.


गेल्या दीड वर्षांपासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आहे. त्यामुळे अनेक महिन्यांपासून जिल्हा लॉकडाऊन आहे. या कालावधीत पर्यटनाला बंदी घालण्यात आली होती. मात्र, सातार्‍याचा पॉझिटिव्ह रेट 6 टक्क्यांवर आल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी निर्बंध शिथील केले. यामध्ये पर्यटनालाही परवानगी देण्यात आली आहे.
हंगाम सुरू करण्यासाठी नोंदणीपासून ते पार्किंगपर्यंत नियोजन करण्याची जबाबदारी कास संयुक्‍त वनव्यवस्थापन समितीची आहे. यंदा कोरोनाचे नियम पाळून दररोज online बुकिंग करणाऱ्या 3 हजार पर्यटकांसाठी प्रवेश देण्याचे निश्चित करण्यात आले.यासाठी 5 वर्षांवरील मुलापासून सर्वांना 100 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

त्यामुळे दोन वर्षांच्या कालावधीनंतर कासवरील फुले नागरिकांना पहावयास मिळणार आहे.
कास पठारावर पावसाळा सुरू झाला की विविध रंगी फुलांच्या प्रजाती अंकुरू लागतात. हळूहळू रंगीबेरंगी फुलांचा बहर वाढत जात असतो. ऑगस्ट ते ऑक्टोबर या महिन्यात रानफुलांचा बहर मोठ्या प्रमाणात येत असतो. ही रानफुले विविध प्रकारची रंगीबेरंगी असतात. हिरव्यागार गालिच्यावर नजर जाईल तिथपर्यंत पसरलेली, वार्‍याची झूळुक आणि डोलणारी पांढरी विविधरंगी फुले अक्षरश: मन मोहून टाकत असतात. यांचे वैशिष्ट म्हणजे दर 15 दिवसांनी त्यांचे रंग बदलत असतात.
काही फुले दरवर्षी येत असतात तर काही टोपली कारवीसारखी फुले दर सात वर्षांनी येत असतात.
कास पठाराच्या फुलांच्या हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर अनेक छोटे मोठे व्यावसायिक अवलबूंन आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!