माढ्यात राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे अनामत घालवून काळे अजित पवारांच्या भेटीला
पंढरपूर : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार ) पक्षाचे पंढरपूर तालुक्यातील नेते आणि सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी पंढरपूर तालुक्याचा समावेश असलेल्या चार विधानसभा मतदार संघात ज्या चार उमेदवारांना पाठींबा दिला होता ते चारही उमेदवार पराभूत झालेले आहेत. विशेष म्हणजे माढा विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार ) पक्षाचा उमेदवार असताना काळे यांनी अपक्ष उमेदवार रणजितसिह शिंदे यांचा प्रचार केला होता. तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे डिपॉजिट जप्त झाले, काळे यांच्या या राजकीय प्रभावाची पंढरपूर तालुक्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.
पंढरपूर तालुक्याचा समावेश पंढरपूर, सांगोला, माढा आणि मोहोळ या चार विधानसभा मतदारसंघात होतो. या चारही मतदारसंघात काळे गटाचे संचालक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत. त्यामुळे चारही मतदारसंघातील उमेदवार काळे यांच्या पाठिंब्यासाठी कसलीही किंमत मोजायला तयार असतात. त्यांच्या याच प्रभावामुळे आजवर भाजप असो, काँग्रेस असो कि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस सर्वच पक्षांनी काळे याना आपली दारे खुली ठेवली आहेत. हे दरवाजे खुले असण्याचा फायदा काळे याना दर निवडणुकीत वेगळ्या पक्षात प्रवेश करण्यासाठी चांगलाच होत आहे. त्यामुळे आजवर काळे यांचे सर्वच पक्ष फिरून झाले आहेत. तसेच सर्व पक्षाच्या नेत्यांच्या गोटातही संचार झालेला आहे.
ज्याला,ज्याला पाठींबा दिला, त्याचा पराभव झाला आहे.
२००४ सालापासून काळे यांनी विधानसभा निवडणुकीत ज्याला पाठींबा दिलेला आहे, त्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. २००४ साली काळे यांनी राजूबापू पाटील याना पाठींबा दिला, त्यावेळी राजूबापू पाटील यांचा पराभव झाला, २००९ साली काळे यांनी विजयसिंह मोहिते – पाटील याना पाठींबा दिला आणि मोहिते -पाटील पराभूत झाले. अपवाद २०१४ सालचा, त्या निवडणुकीत काळे यांनी भारत भालके याना पाठींबा दिला होता आणि त्यावेळी भालके विजयी झाले होते. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत काळे यांनी भाजपचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक याना पाठींबा दिला आणि त्यांचाही पराभव झाला होता. २०२१ च्या पोट निवडणुकीत काळे यांनी भगीरथ भालके याना पाठींबा दिला आणि भगीरथ भालके यांचा पराभव झाला. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काळे यांनी पाठिंबा दिलेले चारही उमेदवार पराभूत झाले आहेत.
सध्या कल्याणराव काळे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात आहेत, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काळे यांनी मोहोळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार यशवंत माने यांचा प्रचार केला. मात्र यशवंत माने यांचा पराभव झाला. मोहोळमध्ये पक्षाचे काम करणाऱ्या काळे यांनी माढा विधानसभा मतदारसंघात मात्र राष्ट्रवादीच्या उमेदवार सौ. एड. मिनलताई साठे यांचा प्रचार न करता अपक्ष उमेदवार रणजितसिंह शिंदे यांचा प्रचार केला. मात्र रणजितसिंह शिंदे यांचाही पराभव झाला. तर पक्षाच्या उमेदवार मीनलताई साठे यांचे डिपॉजिट जप्त झाले. स्वतः. काळे यांच्या वाडी कुरोली गावात रणजितसिंह शिंदे यांच्यापेक्षा विरोधी उमेदवार अभिजित पाटील यांना १०० हुन अधिक मतांची आघाडी मिळाली आहे हा आणखीनच विशेष मानले जाते.
सांगोला विधानसभा मतदारसंघात काळे यांनी महायुतीचे उमेदवार एड. शहाजीबापू पाटील याना पाठींबा देऊन त्यांच्या कार्यकर्त्यांनी बापूंचा प्रचार केला. मात्र सहकार शिरोमणी साखर कारखाना असलेल्या भाळवणी सह काळे यांच्या शिक्षण संस्था, शेती असलेल्या धोंडेवाडी गावात शहाजी बापुना कमी मते मिळाली आणि निवडणुकीत शहाजी पाटील यांचाही पराभव झाला.
बाजूच्याच पंढरपूर विधानसभा मतदार संघात काळे यांनी महाविकास आघाडीच्या भगीरथ भालके यांना पाठींबा दिला होता. काळे समर्थकांनी भालके यांच्यासाठी मोठे कष्ट केले, काळे समर्थकांच्या गावात भालके यांना मताधिक्यही मिळाले, तरीही भगीरथ भालके यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे पंढरपूर तालुक्यात काळे यांनी ज्यांना ज्यांना पाठींबा दिला ते उमेदवार पराभूत झाले आहेत.