कौठाळी गाव झाले कोरोना मुक्त

29 लोक होते कोरोनाग्रस्त : शून्य गाठला गावाने

पंढरपूर : ईगल आय मीडिया

एकाच कुटुंबातील 14 लोक कोरोना पॉझिटिव आल्यामुळे खळबळ उडालेल्या कौठाळी गावाने आरोग्य विभाग स्थानिक ग्राम समिती व सामाजिक, स्वयंसेवी संघटनांच्या प्रयत्नातून पूर्णपणे कोरोना मुक्त होण्याचा पराक्रम केला आहे. कौठाळी ( ता.पंढरपूर ) या गावात तब्बल 29 लोक कोरोना पॉझिटिव्ह सापडले होते. मात्र ग्रामस्थांनी वेळीच जोरदार प्रयत्न केल्यामुळे शुक्रवार ( 28 ऑगस्ट) रोजी संपूर्ण गाव कोरोना मुक्त झाले आहे. गावात सद्यस्थितीत एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नाही. त्याबद्दल ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे. कौठाळी गावातील एकाच कुटुंबात 14 लोक कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर त्यांच्या संपर्कातील इतर पंधरा लोकही कोरोना पॉझिटिव्ह सापडले होते. यामुळे गावातील एकून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 29 वर गेली होती.

दरम्यान, गावातील कोरोना प्रसाराला आळा घालण्यासाठी स्थानिक ग्राम समिती, ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथील सर्व आरोग्य कर्मचारी , गावातील स्वयंसेवी संघटना यांनी नेटाने प्रयत्न केले.

गावातील वाड्या-वस्त्यांवर सर्वेक्षण करण्यात आले, तसेच सर्वांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात आले, त्याचबरोबर वाड्यावर त्यात स्वच्छता करण्यात आली. साठ वर्षाच्या पुढील नागरिकांची विशेष काळजी घेण्यात आली. गावातील लक्षणे दिसत असलेल्या 103 लोकांचे swab तपासणी करण्यात आली. गावातील प्रत्येक घरात आणि वाड्या – वस्त्यावर जिवण रक्षक आयुर्वेदिक काढा, तसेच आरोग्य विभागाच्यावतीने आवश्यक त्या औषध गोळ्यांचे वितरण करण्यात आले. ग्रामस्थांनी या काळात सोशल डिस्टंसिंग पाळून स्वतःला व गावावर आलेले कोरोना संकट परतवून लावण्यासाठी आरोग्य विभागाला मोठे सहकार्य केले. त्यामुळे गावातील सर्व कोरोना ग्रस्त नागरिक बरे होऊन घरी आले आहेत. सद्यस्थितीत कौठाळी मध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही व पुढच्या काळातही कोरोनाचा शिरकाव होणार नाही याची दक्षता घेण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केल्याचे दिसून येते.

Leave a Reply

error: Content is protected !!