कोयना धरणावर आढळला 9 फुट लांबीचा अजगर

धरणाच्या औटलेट दरवाजावर अडकल्याने कसरत करून वाचवले

टीम : ईगल आय मीडिया

कोयना धरणाच्या औटलेट दरवाज्या वर असलेला भला मोठा अजगर सर्प मित्रांनी जीव धोक्यात घालून काढला असून त्याला कोयना अभयारण्यात सोडण्यात येत आहे. सुमारे 9 फुटांचा अजगर कोयना धरणाच्या दरवाजावर आला कुठून असा प्रश्न पडला आहे.

रोमहर्षक vdo पहा

सकाळच्या वेळी नेहमीप्रमाणे धरणातील पाण्याची पातळी पाहण्यासाठी कोयना धरणाचे कर्मचारी गेले असता. पातळी पाहण्याच्या मोजपट्टी शेजारी असलेल्या शिडीवर त्यांना हा भलामोठा साप दिसला. त्यांनी तात्काळ ही गोष्ट वरिष्ठांना कळवली. वरिष्ठांनी कोयना वन्यजीव चे वनरक्षक अतुल खोत यांच्याशी संपर्क साधून साप असल्याचे कळवले.

वनरक्षक खोत यांनी महाराष्ट्र अनिमल रिट्रायविंग असोसिएशन(ए. आर.ए.) चे अध्यक्ष सर्पमित्र विकास माने यांना कळवले. विकास माने हे सहकारी अश्वजित जाधव यांच्यासह धरणाच्या भिंतीवरती पोहचले. अजगर हे धरणातील पाण्यात उतरण्यासाठी असलेल्या अंगलच्या शिडीवर असल्यामुळे तिथे पोहचणे अवघड होते.


भारतीय अजगराला इंग्रजीमध्ये इंडियन रॉक पायथन असे म्हणतात. याची अधिकतम लांबी 24 फुटपर्यत असते. जानेवारी ते मार्च हा मिलनाचा कालावधी असून, मादी पालापाचोळ्याचा ढीग करून त्यात 20 ते 80 अंडी घालते. या सापाचे मुख्य खाद्य उंदीर, घुस अश्या छोट्या प्राण्यांपासून माकड, कोल्हा, कुत्रा, वासरू, सालींदर, बिबट्या हे आहे. हा साप भारतात सर्वत्र आढळतो.

खाली जायचं म्हणलं तर एका हाताने अँगल व दुसऱ्या हाताने अजगर पकडावे लागेल. पण अजगर ने अशावेळी अँगल ला पिळा घातल्यास त्याला एका हाताने काढणे जमणार नाही. व जरा तोल गेला तर आपण सरळ धरणाच्या पाण्यात पडू शकतो. त्यामुळे त्याला बाहेर कसं काढायचं याचा प्रश्न पढला होता.

पण त्याला सुखरूप पकडून जंगलात सोडणे महत्वाचे आहे, म्हणून सर्पमित्र विकास माने यांनी त्याला खाली जाऊन चिमट्याच्या साहायाने वर काढायचे ठरवले. माने यांनी खाली उतरून एका हाताने अँगल व दुसऱ्या हातात चिमट्याच्या साहाय्याने त्या अजगराला पकडले. पण अजगराने त्या अँगल ला पिळा घातल्यामुळे व अजगराचे वजन जास्त असल्यामुळे त्याला वर काढणे अवघड होते.

त्यामुळे सहकारी अश्वजित जाधव यांच्याकडे अजगर पकडलेला चिमटा देऊन माने यांनी अजगराचा पिळा काढून शेपटीच्या साहाय्याने वर काढले. नंतर त्याला व्यवस्थित पकडून मोठ्या कापडी पिशवीत घालण्यात आले. अजगर हा साप निशाचर आहे त्यामुळे त्याला रात्री वनविभागाच्या अधिकाऱ्यांसमक्ष जंगलात सोडण्यात येणार आहे.

या सापाविषयी समाजात अनेक गैरसमज आहेत. पण हा साप पूर्णपणे बिनविषारी असून माणसाला यांच्यापासून कसल्याही प्रकारचा धोका नसतो. तसेच या सापाला वन्यजीव संरक्षण कायद्या अंतर्गत जास्त संरक्षण आहे त्यामुळे याला मारल्यास मोठी शिक्षा होऊ शकते. त्यामुळे असा किंवा इतर कोणताही साप आढळल्यास तात्काळ जवळच्या वनविभागाशी अथवा सर्पमित्रांशी संपर्क साधा असे आवाहन केेलेे आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!