महाविकास आघाडी सरकारची दुसरी परीक्षा

संपूर्ण राज्यातील 14 हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका

राज्याच्या सर्व विभागात या निवडणुका होत आहेत, त्यामुळे खऱ्या अर्थाने राज्य सरकारसाठी ही जनादेश परीक्षा ठरणार आहे.

टीम : ईगल आय मीडिया

गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीनंतर एकत्र येऊन राज्यात सरकार स्थापन केलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघाडीला आता दुसऱ्या परिक्षेला सामोरे जावे लागणार आहे. नुकत्याच विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या पहिल्या परीक्षेत दणदणीत यश मिळवल्यानंतर राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या निवडणूक निमित्ताने राज्य सरकार दुसऱ्या परिक्षेला सामोरे जात आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर या सरकारला जनादेश नाही असा आरोप विरोधी पक्ष करीत आहे. त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीत आपला जनादेश दाखवल्यानंतर आता ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा महाविकास आघाडीला आपला जनादेश दाखवण्याची संधी चालून आली आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने ग्रामपंचायतींच्या निवडणुका प्रथमच होत आहेत.

एप्रिल ते डिसेंम्बर 2020 दरम्यान मुदत संपलेल्या राज्यातील एकूण १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यानुसार १५ जानेवारीला मतदान होणार आहे. १० डिसेंबर रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर आता त्यापुढील प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

विधानपरिषदेच्या निवडणुकीत दिसली तशीच चुरस यामध्ये दिसण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागावर आपली पकड मजबूत करण्यासाठी राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत बाजी मारणाऱ्या महाविकास आघाडीसाठी ही राजकीय आखाड्यातील दुसरी परीक्षा ठरणार आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!