रड्डे ( ता. मंगळवेढा ) येथील पोलीस दाम्पत्याचा प्रेरक उपक्रम
रड्डे : दत्ता कांबळे
स्वतः आर्थिक हलाखीच्या परिस्थितीत अर्धवेळ खाजगी नोकरी करून पोलीस दलात भरती झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या पोलीस पत्नीला सोबत घेऊन दुष्काळी भागातील सर्वसामान्य कुटुंबातील युवकांसाठी मदतीचा मोठा हात पुढे केला आहे. त्यांच्या या कार्यामुळे रड्डे ( ता. मंगळवेढा ) येथील अनेक युवकांच्या स्वप्नांना आकांक्षा पूर्तीचे नवे धुमारे फुटले आहेत.
ग्रामीण भागात स्पर्धा परीक्षा, पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणार्या युवकांसाठी अभ्यासिका व शारीरिक चाचणीचे साहित्य पोलीस दलातील पती पत्नीनी पुढाकार घेऊन तालुक्यातील रड्डे गावात उपलब्ध केले.त्याचा उपक्रम बेरोजगार व प्रयत्नवादी युवकासाठी आदर्श ठरला आहे.
मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी रड्डे गावात अनेक सुविधा चा अभाव आहे. या गावातील बहुतांश कुटूंबाचा ऊस तोडणी व्यवसायाशी अधिक संबंध येतो. गावात सुविधाचा अभाव असल्याने गाव सोडून जावे लागते. या गावांतील अनेक तरूणांनी जिद्दीच्या जोरावर मोठे यश संपादन केले. त्यामध्ये जिल्हाधिकारी झालेल्या तृप्ती दोडमिसे- नवत्रे, डीवायएसपी. सचिन थोरबोले, ए.पी.आय.बालाजी कांबळे, पी.एस.आय. सूर्यकांत सप्ताळे यांच्या निवडीनंतर अनेक तरूणांनी स्पर्धा परिक्षेचा मार्ग निवडला.
स्पर्धा परिक्षा व पोलीस,सैन्य दलात भरती होण्यासाठी पुणे,मुंबई, व अन्य अॅकेडमीत पैसे भरून जावे लागते. पण गरीब तरूणांसमोर पैशाचा मोठा प्रश्न समोर आहेच.त्यातून प्रयत्न करणारे अनेक तरूण कोरोना संकटात गावी आले.त्या तरूणांचा अभ्यास व शारीरिक चाचणीत खंड पडू लागला पण संभाव्य पोलीस भरती अभ्यास व शारीरिक चाचणीसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याचा संकल्प सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील श्वान पथकातील पोलीस नाईक लक्ष्मण कोळेकर व सुरक्षा शाखेतील त्यांच्या पत्नी पोलीस नाईक विद्या मळगे-कोळेकर यांनी त्यांच्या खांद्यास खांदा सहकार्य करत आहेत .त्यासाठी रड्डे गावात स्पर्धा परीक्षा आणि पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांसाठी सार्वजनिक अभ्यासिका साठी आर्थिक मदत देत एकाच वेळी 32 विद्यार्थी अभ्यास करू शकतील अशी व्यवस्था करून नामवंत लेखकांची पुस्तके उपलब्ध केली.या अभ्यासिकेत गावातील तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग वाढला आहे. धावण्यासाठी मैदान, पुलअपसचे खांब, गोळा फेक मैदान, 100 मिटर मैदान तयार केले आहे.त्याचा लाभ गावात व परिसरात प्रयत्न करणाऱ्या तरूणांना होऊ लागला.
बेरोजगारासाठी केलेल्या उपक्रमाबरोबर लोकांच्या सहभागातून गावात श्रमदान करून गावात स्वच्छता करून ठिकठिकाणी वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले. त्यांना गावातील विकास सांगोलकर, सिद्धनाथ कांबळे, रामा सपताळे, दिगंबर नवत्रे , सुनील थोरबोले, अनिल थोरबोले राजू गवळी, अजय सपताळे यांच्यासह अनेक तरुणांनी सहकार्य केले.
शिक्षण घेत मी प्लाॅन्ट ऑपरेटर म्हणून काम करत भरतीची तयारी 2005 पासून केली.त्यात 2007 ला यश आले.पण ग्रामीण भागात परिस्थितीशी सामना करताना प्रयत्नशील युवकांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला
– लक्ष्मण कोळेकर , पोलीस नाईक
दुष्काळी रड्डे गावातील या पोलीस पती-पत्नीने केलेल्या उपक्रमाची राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दखल घेत त्यांच्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले आणि पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.