35 गावच्या पाणी प्रश्नांवर भाजप सरकारने काय केलं ते जाहीर करावं

ऍड.नंदकुमार पवार यांचे भाजपला आव्हान !


मंगळवेढा : ईगल आय मीडिया


मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी 35 गावांतील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने काय केले त्याचा हिशोब द्यावा आणि मग पाणी प्रश्नावर बोलावे. पाणी प्रश्न दिवंगत आमदार भारत भालके यांच्या प्रयत्नामुळे आणि काँग्रेस आघाडी सरकारने केलेल्या मदतीमुळे सुटण्याच्या मार्गावर आहे. हा प्रश्न सुटू नये म्हणून आडकाठी निर्माण करणाऱ्या भाजपने पुतणा मावशीचे प्रेम दाखवू नये अशी टीका मंगळवेढा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष ऍड.नंदकुमार पवार यांनी केली.
The eagle eye न्यूज वेबसाईट च्या प्रतिनिधींशी ते बोलत होते.

5 वर्षे राज्याची सत्ता हाती असताना भाजपने 35 गावच्या पाणी प्रश्नात खोडा घातला आहे. आ.प्रशांत परिचारक, उमेदवार समाधान अवताडे यांनी या प्रश्नी काहीही केलेले नाही. आता यावर काही बोलण्याचा त्यांना अधिकार नाही, हा प्रश्न आता भगीरथ भालके यांच्या नेतृत्वाखाली सुटू शकतो असाही विश्वास ऍड.पवार यांनी व्यक्त केला.


यावेळी पुढे बोलताना ऍड.पवार म्हणाले की, मंगळवेढा तालुका हा नैसर्गिकरित्या दुष्काळी भाग आहे. या भागाला दुष्काळमुक्त करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. स्व.नागनाथअण्णा नायकवडी, जेष्ठ नेते माजी आम.गणपतराव देशमुख, डॉ.भारत पाटणकर यांच्या पुढाकाराने पाणी परिषदा घेण्यात आल्या आणि दुष्काळी भागाचा पाणी प्रश्न ऐरणीवर आला. मंगळवेढा तालुक्यातील प्रा. शिवाजीराव काळुंगे सर, मी स्वतः या प्रश्नी सतत आग्रही होतो, शासन दरबारी प्रयत्न सुरू होते. 2009 सालच्या लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घातल्यानंतर आणि भारत भालके आमदार झाल्यानंतर या प्रश्नाला खऱ्या अर्थाने गती मिळाली.

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही या कामी मोठे सहकार्य केले. आ. भालके यांनी विधानसभेत आणि प्रशासकीय पातळीवर ही सतत पाठपुरावा केला. अगदी शिपायासारखे फाईली हातात घेऊन मंत्रालयाचे, जलसंपदा विभागाचे उंबरठे झिजवले. 35 गावांसाठी पाणी उपलब्ध असल्याचे कागदोपत्री दाखवून दिले. राज्यपालांनी विदर्भ अनुशेष भरून काढण्यासाठी घातलेली जाचक अट शिथिल करून घेतली. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबा चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी 2014 साली अखेरच्या टप्प्यात मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला मंजुरी दिली.

दरम्यानच्या काळात आम.भालके यांनी सतत पाठपुरावा करून टेम्भू उपसा सिंचन योजनेतील 11 गावांना पाणी येण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले. त्यामुळे 11 गावाचा पाणी प्रश्न सुटण्याच्या दृष्टिपथात आला आहे.

मधल्या काळात भाजप सरकारने मंगळवेढा उपसा सिंचन योजना गुंडाळून टाकण्याचा प्रयत्न केला. दुष्काळी भागातील जनतेच्या भावनांशी कठोर खेळ केला.मात्र आम भालके यांनी न्यायालयात आणि सभागृहात ही भाजप सरकारला उघडे पाडत उपसा सिंचन योजना जिवंत ठेवली. आता, राज्यात पुन्हा शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीचे सरकार आले आहे. हेच सरकार हा प्रश्न सोडवू शकते आणि दुष्काळी भागाला पाणी देऊ शकते असेही ऍड. पवार म्हणाले.

Leave a Reply

error: Content is protected !!