आ. भालकेंच्या प्रकृतीची राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही काळजी

तब्येतीची माहिती घेण्यासाठी नेत्यांची रुबी कडे धाव

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर चे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने तब्येतीची माहिती घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी रुबी हॉल क्लिनिककडे धाव घेतली आहे.

आ.भारत भालके यांची प्रकृती गंभीर असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये चिंता व्यक्त होत आहे. पंढरपूर सारख्या प्रतिष्ठित मतदारसंघात 10 वर्षांनी आम.भालकेनी राष्ट्रवादीचा झेंडा फडकावला आहे, तसेच पक्षाचे अध्यक्ष खा.शरद पवार यांचे सोलापूर जिल्ह्यातील विश्वासू कार्यकर्ते म्हणूनही आ.भालके यांची ओळख होती. त्यामुळे भालके यांच्या प्रकृतीची पक्षाच्या नेत्यांनाही चिंता लागली आहे.

आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रुबी हॉस्पिटलला भेट देऊन भालके यांच्या तब्येतीची माहिती घेतली. रुबीच्या डॉक्टरांसोबत त्यांनी उपचारा संदर्भात चर्चा केली. भालके यांची प्रकृती खालावल्याचे गुरुवारी समजताच खा. पवारांनी त्यांना अधिक चांगल्या उपचारासाठी लीलावती हॉस्पिटलमध्ये हलवण्याची सूचना केली होती. नाजूक परिस्थिती असल्याने भालके यांना स्थलांतरित करणे जोखमीचे असल्याचे डॉक्टरनी सांगीतल्यानंतर लीलावती चे तज्ञ डॉक्टर्सचे पथक पाचारण करण्याची सूचना खा. पवारांनी केली होती असे समजते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही गुरुवारी भालके यांच्या प्रकृतीची विचारपूस केली असून आज शुक्रवारी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा सौ.रुपाली चाकणकर, आम.रोहित पवार यांनीही रुबी हॉस्पिटलमध्ये जाऊन भालके यांचे पुत्र भगीरथ यांच्याशी चर्चा केली..एकूणच आ.भालके यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजताच जिल्ह्यातील नागरिकांतून चिंता व्यक्त होत असतानाच राष्ट्रवादी च्या वरिष्ठ नेत्यांनाही भालके यांच्या प्रकृतीची काळजी लागल्याचे दिसून येते.

Leave a Reply

error: Content is protected !!