व्हेंटिलेटर लावल्यानंतर आ.भारत नानांचा अखेरचा मेसेज

व्हेंटिलेटर लावल्यानंतरही नानांनी त्यांचे खाजगी सचिव रावसाहेब फाटे यांना केला होता अखेरचा मेसेज

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर -मंगळवेढा मतदार संघाचे दिवंगत आमदार भारत भालके यांनी मंगळवेढा तालुक्यातील 35 गावच्या पाणी प्रश्नावर अखेरच्या श्वासापर्यंत झुंज दिली आहे. व्हेंटिलेटर लावल्यानंतरही त्यांनी आपले सहाय्यक रावसाहेब फाटे यांच्या मोबाईलवर 35 गावच्या पाण्यासंदर्भात मेसेज पाठवला होता. यावरून आम.भालके यांनी दुष्काळी 35 गावच्या पाणी प्रश्नासाठी अखेरच्या श्वासापर्यंत झुंज दिल्याचे दिसून आले आहे.

मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील 40 पेक्षा अधिक गावांमध्ये कायमचा दुष्काळ असतो. महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागते आणि पुरुषांना घर चालवण्यासाठी स्थलांतर करावे लागते. या दुष्टचक्रातुन जनतेला कायमचे सोडवण्यासाठी आ.भारत भालके यांनी 2009 पासून निकराचे प्रयत्न केले.राज्यपालांनी विदर्भ, मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी प.महाराष्ट्रात नवीन योजनेला 15 वर्षांपासून बंदी घातली होती. तरीही मोठ्या कौशल्याने त्यांनी एकमेव मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला राज्यपालांची मंजुरी मिळवली.

मात्र त्यानंतर राज्यात सरकार बदलले. भाजपच्या सरकारने योजनेतील गावे वगळली, पाणी कोटा कमी केला होता, त्यामुळे पुन्हा न्यायालयात जाऊन, रस्त्यावर उतरून, सभागृहात आवाज उठवून सरकारला जेरीस आणले. राज्य सरकारवर न्यायालयात विजय मिळवून भालके यांनी योजनेची लढाई जिंकली होती. त्यानंतर राज्यात पुन्हा सरकार बदलले आणि शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे सरकार आले. या सरकार कडून पुन्हा योजनेला पूर्ववत स्वरूपात मंजुरी मिळवून घेतली आणि टोकन निधीही मंजूर करून घेतला. त्यानंतर ही प्रत्यक्षात कामाला सुरुवात होत नव्हती त्याकरिता भारत भालके सरकार दरबारी नेटाने प्रयत्न करीत होते.

मागील 8 महिने कोरोनाचा काळ असूनही भारत भालके केवळ 35 गावचा पाणी प्रश्न आणि विठ्ठल सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी झटत होते. नोव्हेंबरमध्ये विठ्ठल’च्या गव्हाणीत मोळी टाकून कारखाना सुरू करण्यात त्यांनी यश मिळवले होते. मात्र 35 गावच्या पाणी प्रश्न त्यांच्या समोर उभा होता.

” 35 गावच्या पाणी प्रश्नी लेखशीर्षमध्ये निधी तरतूद करण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या नावे पत्र लिहा. आणि भगीरथ यांना त्या भागातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन हे निवेदन द्या ” असा संदेश पाठवला होता. तो संदेश त्यांनी पाठवलेला अखेरचा संदेश ठरला असून त्यानंतर मात्र त्यांची तब्येत खालावत गेली आणि 28 नोव्हेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

कोरोना पाश्चात्य आजारामुळे जेव्हा भारत नाना पुण्यात रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते. त्याही परिस्थितीत त्यांनी हॉस्पिटलमधून फोनवर विठ्ठल सहकारीचा गाळप हंगाम आणि 35 गावच्या पाणी प्रश्नावर पाठपुरावा सुरूच ठेवला होता. 20 नोव्हेंबर नंतर त्यांचा आजार बळावला होता. डॉक्टर त्यांना फोन वापरू देत नव्हते तरीही हट्टाने त्यांनी फोनचा वापर सुरूच ठेवला होता. सोमवार ( दि.23 नोव्हेंबर ) रोजी त्यांना व्हेंटिलेटर लावण्यात आला. तशा परिस्थितीत ही त्यांनी त्यांचे मंगळवेढा येथील कार्यालयीन सहाय्यक रावसाहेब फाटे यांच्या मोबाईलवर मेसेज पाठवला.

एखाद्या लढाईत योद्धा धारातीर्थी पडे पर्यंत शास्त्र टाकत नाही, लढाई सोडत नाही हेच भारत नानांनी करून दाखवले. त्यांची पाणी प्रश्नांची, दुष्काळी जनतेला समृद्ध करण्याची लढाई अर्धवट राहिली नसली तरी ती जिंकण्यासाठी आता त्यांच्या वारसांना, पदाधिकाऱ्यांना, पक्षाच्या नेत्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. आणि तीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरणार आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!