म्हणून भारत नानांनी टिळक स्मारक मैदानात एकही सभा घेतली नाही

पंढरपूर : ईगल आय मीडिया

आ.भारतनाना भालके यांनी 2004 नंतर पंढरपूर शहरातील सर्वात मोठ्या असलेल्या टिळक स्मारक मैदानात एकही राजकीय सभा घेतली नाही, गर्दीच्या तुलनेत जागा अपुरी पडत असतानाही त्यांनी शिव तिर्थावरच सभा घेतली. त्याच कारण त्या टिळक स्मारक मैदानात घेतलेल्या सभेनंतर यश मिळत नाही असे भारत नाना मानत होते. आणि त्या मैदानात झालेल्या सभांचा इतिहास पाहिला असता त्यात तथ्य ही असल्याचे समोर येते.

आम.भारत भालके यांचे 3 दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले, त्या धक्क्यातून अजूनही पंढरपूर , मंगळवेढा तालुका आणि सोलापूर जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक जीवन सावरलेले नाही. एक राजकीय दंतकथा बनून भारत नानांच्या अनेक घटना, त्यांच्या जीवनातील प्रसंग आता समोर येऊ लागले आहेत, लोक सांगू लागले आणि सोशल मीडियावर शब्दबद्ध करू लागले आहेत. कुस्तीच्या फडातील हा तरबेज गडी राजकीय फडातही तेवढाच निष्णात, डाव पेचात माहीर असा होता.

राजकीय कुस्ती लागल्यानंतर कोणता डाव कधी मारायचा हे त्यांचं अगोदरच निश्चित असायचं. निवडणूक जिंकण्यासाठी ते कोणतीही कसर सोडत नव्हते, कोणतीही जोखीम घ्यायला एका पायावर शड्डू ठोकून सज्ज असायचे. त्यांच्या निवडणुक सभा म्हणज विरोधकांच्या काळजात धडकी भरवणाऱ्या असायच्या. मतदारसंघात त्यांच्या एवढी गर्दी खेचणारा दुसरा नेता नव्हता. आणि अशा सभा घेताना भारत नाना मैदानाची निवड सुद्धा चुकणार नाही याची काळजी घ्यायचे.

पंढरपूर शहरात भारत नानांच्या सर्वच सभा या शिवतीर्थावर, किंवा संत तनपुरे महाराज मठातील मैदानावर झाल्या. 2004 चा अपवाद वगळता त्यांनी शहरातील सर्वात मोठ्या टिळक स्मारक मैदानावर एकही सभा घेतली नाही. कारण त्या मैदानावर निवडणुकीची सभा घेतली तर पराभव निश्चित होतो असे ते उदाहरणांसह सांगायचे. 2004 साली विधानसभा निवडणुकीत खुद्द भारत नानांच्या प्रचारासाठी टिळक स्मारक मैदानावर सभा झाली, सभेला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आले होते आणि प्रचंड गर्दीही झाली होती. तरीही त्या निवडणुकीत भारत नानाचा पराभव झाला. एवढेच नाही तर आजवर त्या मैदानांवर ज्या उमेदवारांनी सभा घेतल्या ते सगळे निवडणुकीत हरले आहेत. 2014 साली प्रशांत परिचारक यांची पहिली प्रचार सभा टिळक स्मारक मैदानावर प्रचंड गर्दी आणि जल्लोषात झाली होती. त्यानंतर त्यांच्या साठी पंतप्रधान मोदींची सभा शहरात होऊनही परीचारक पराभूत झाले होते.

याउलट भारत भालके यांची 2009 सालची सभा शिवतीर्थावर झाली आणि त्यांनी विजयसिंह मोहिते पाटलांना पराभूत केले. 2011 च्या पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणूकित आजारी असल्याने भारत नानांनी शेवटची केवळ एकच सभा शिवतीर्थावर घेतली त्या एकमेव सभेने नगरपालिकेत सत्तांतर घडवले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत खा शरद पवार यांची लोकप्रियता शिखरावर होती, शहरातील कोणतेही मैदान सभेसाठी अपुरे ठरेल अशी चर्चा होती. त्यामुळे रेल्वे मैदानावर सभा घ्यावी अशी कार्यकर्त्यांची मागणी असताना ही भारत नानांनी शिवतीर्थावर च ती सभा घेतली. आजवरच्या पवारांच्या पंढरीतील सभांचा विक्रम मोडणारी ती सभा ठरली आणि प्रतिकूल परिस्थितीतही भारत नानांच्या विधानसभा विजयाची हॅटट्रिक सुद्धा त्याच सभेमुळे निश्चित झाली.

शहरातील टिळक स्मारक मैदान हे राजकीय सभांसाठी अपयशी असल्याची त्यांची समजूत या तथ्यानुसार वास्तव होती हे मान्य करावे लागत आहे. या एका गोष्टीवरून ही भारत नाना निवडणूक जिंकण्यासाठी किती बारकाईने नियोजन करीत होते याचाही प्रत्यय येतो आणि नव्या राजकीय पिढीला एक उदाहरण घालून देतो.

Leave a Reply

error: Content is protected !!