पवार यांनी घेतली स्व.गणेश गोडसे यांच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी
गुरसाळे येथील स्व. गणेश गोडसे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन करताना आमदार रोहित पवार. याप्रसंगी डॉ. योगेश रणदिवे, रामभाऊ गायकवाड, गणेश पाटील व इतर.
पंढरपूर : ईगल आय मीडिया
पवार कुटुंबीय आपल्या निष्ठावान कार्यकर्त्यांची नेहमीच काळजी करते. त्यांचा सुख-दुःखात पाठीशी असते हे सर्वज्ञात आहे. याचाच प्रत्यय आमदार रोहित पवार यांच्या रूपाने गुरसाळे ग्रामस्थांना आला. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी गुरसाळे येथे शरद प्रतिष्ठानचे सोलापूर जिल्हाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते स्व. गणेश गोडसे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी त्यांनी स्व. गोडसे यांच्या दोन्ही मुलांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी आपण स्वतः घेत असल्याची ग्वाही दिली.
गुरसाळे (ता.पंढरपूर ) येथील गणेश गोडसे हे राष्ट्रवादीचे सक्रीय कार्यकर्ते आणि आमदार रोहित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. इंदापूरजवळ नुकत्याच झालेल्या भीषण अपघातात गोडसे यांच्यासह गुरसाळे येथील अविनाश पवार व बाळासाहेब साळुंखे अशा तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर स्वतः आमदार रोहित पवार यांनी गोडसे, पवार आणि साळुंखे या तिन्ही कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. पवार कुटुंबीय सदैव आपल्या पाठीशी राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
अन मोटारसायकलवरून प्रवास
इंदापूर जवळील अपघात स्व. गोडसे यांचे सहकारी अविनाश पवार आणि बाळासाहेब साळुंखे हे ही मयत झाले होते. गोडसे कुटुंबीयांचे सांत्वन केल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी स्व. अविनाश पवार यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर साळुंखे यांच्या घरी जाण्यासाठी चांगला रस्ता नाही आणि चारचाकी वाहन जात नसल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. यावर आमदार पवार यांनी मोटारसायकल आणायला सांगून त्यावर ते स्व. बाळासाहेब साळूंखे यांच्या घरी गेले. संबंधित कुटुंबियांशी संवाद साधत धीर दिला.
स्व. गणेश गोडसे यांचा एक मुलगा सहावीत आणि दुसरा तिसरीत शिक्षण घेत आहे. या दोन्ही मुलांची यापुढील संपूर्ण शिक्षणाची, राहण्याची, जेवणाची जबाबदारी आपण घेत असल्याचे आमदार पवार यांनी सांगितले. तात्काळ बारामती येथील शैक्षणिक संकुलात त्यांची सर्व व्यवस्था करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. याचवेळी गोडसे कुटुंबीयांची इच्छा असेल तर स्व. गणेश यांच्या पत्नीला नोकरी देऊ, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
या भेटीप्रसंगी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रामभाऊ गायकवाड, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष ऍड. गणेश पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर भोसले, डॉ. योगेश रणदिवे, तालुका पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्यासह पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.