शिंदे सेनेच्या वादग्रस्त आमदाराचा आणखी एक प्रताप
टीम : ईगल आय न्यूज
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षातील नेहमी वादात अडकणाऱ्या आमदाराचा आणखी एक पराक्रम समोर आला असून यावेळी या आमदाराने आपल्या गुन्हेगारी प्रवृत्तीचे प्रदर्शन केले आहे. शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या लाडक्या पुत्राच्या वाढदिवसानिमित्त चक्क तलावारीने केक कापला आणि तलवारीच्या टोकावर केक घेऊन तसाच मुलास भरवला आहे. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासन काय कारवाई करणार याकडे आता लक्ष लागले आहे.
बुलडाण्यातील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड हे नेहमी वादग्रस्त राहिलेले आहेत. अधिकाऱ्यांसह विरोधकांना नेहमी धमक्या देणे, मारहाण करणे यासाठी नेहमीच चर्चेत राहतात यापूर्वी त्यांनी आपण वाघाची शिकार केली असून त्याचाच दात आपल्या गळ्यातील ताईतामध्ये असल्याचा दावा आ. गायकवाड यांनी केला होता. बेताल वक्तव्ये करणे, धमक्या देणे, मारहाण करणे, अशा गोष्टींसाठी संजय गायकवाड हे कुप्रसिध्द आहेत. संजय गायकवाड हे शिवसेनेकडून सलग दुस-यांदा बुलडाणा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत आणि शिवसेनेत बंड झाल्यानंतर गायकवाड यांनी शिंदे गटात उडी मारली.
नुकतेच संजय गायकवाड यांनी त्यांचा मुलगा मृत्युंजय गायकवाड यांचा वाढदिवस बुलडाण्यातील जैस्तंभ चौकात साजरा केला. हे बुलडाण्यातील वर्दळीचे ठिकाण असून अशा वर्दळीच्या ठिकाणी युवासेनेचे जिल्हाप्रमुख मृत्युंजय गायकवाड यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यातच संजय गायकवाड यांनी तलवारीने केक कापून तलवारीच्या टोकावर केक घेऊन तो मुलाला भरवला. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
यावर काहीच कारवाई होणार नाही, कारण ते सामान्य नागरिक नाहीत