अखंडित, अथक प्रयत्नाने शिक्षकांना आणले सुवर्णदिन !

आ. दत्तात्रय सावंत (सर) वाढदिवस विशेष

आंबे ( ता. पंढरपूर ) भीमा नदी काठच्या या छोट्याशा गावातून राज्यभरात शिक्षण आणि शिक्षकांच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे, ते प्रश्न तडीस लावणारे सेवाव्रती शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत सरांचा आज वाढदिवस. त्यानिमित्ताने महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे प्रसिद्धी प्रमुख भीमा व्यवहारे यांनी सरांच्या कार्याचा थोडक्यात घेतलेला आढावा !

आंबे येथील जिजामाता प्रशालेत स्वतः दत्तात्रय सावंत सर यांनी विनावेतन आकरा वर्ष शिक्षक म्हणून काम केले. त्यामुळे स्वतःला व आपल्या सहकाऱ्यांना वेतन मिळावे यासाठी सर्वांना एकत्र करून त्यांनी संघटना उभी केली. आंदोलन, उपोषण करून वेतन मिळवून दिले, वेतनाचा प्रश्‍न सुटल्यानंतर आपल्या इतर शिक्षकांना हि पगार मिळाला पाहिजे, त्यांच्या समस्यांचे निराकरण झाले पाहिजे, म्हणून त्यांनी लढा पुढे चालू ठेवला. त्यांच्यातील नेतृत्वगुण पाहून हजारो शिक्षकांनी त्यांच्या नेतृत्वाखाली लढा दिला. प्रश्न पीडित शिक्षकांना न्याय मिळवून देण्याचे काम दत्तात्रय सावंत यांनी सातत्याने केले. त्यांच्या परिसस्पर्शाने, सहवासाने विना वेतन खचलेल्या, पिचलेल्या लाखो शिक्षकांच्या मनात हत्तीचे बळ आले , अनेक संकटात ही संघर्ष करीत उत्साही जीवन जगण्याची उर्मी निर्माण झाल्याने शिक्षकांना सुवर्णदिन आले आहे.

शासन कोणत्याही पक्षाचे असले तरी शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या, शासनाने दररोज अनेक समस्या निर्माण करणारे शासन आदेश काढले, त्यामुळे अध्यापनापेक्षा इतर समस्यांना शिक्षकांना तोंड द्यावे लागले आहे, त्या समस्यांचा निपटारा शिक्षक प्रतिनिधी म्हणून आमदार दत्तात्रय सावंत अहोरात्र प्रयत्न करीत आहेत.

राज्यामध्ये पगारदार शिक्षकांना आर्थिक मदत कर्ज देणाऱ्या अनेक पतसंस्था आहेत, परंतु पगार नसणाऱ्या शिक्षकांना आर्थिक मदत करण्यासाठी कर्ज देणारी राज्यातील पहिली पतसंस्था मे २००५ मध्ये पंढरपूर येथे आमदार दत्तात्रय सावंत यांनी सुरू केली. त्यांनी आदर्शवत पतसंस्था चालवली, सोलापूर जिल्हातील बाळे येथील भ्रष्टाचाराने आर्थिक संकटात सापडलेल्या शिक्षक पतसंस्थेवर २०१४ च्या निवडणूकित त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे संचालक मंडळ निवडून आले. पारदर्शक कारभारामुळे पतसंस्थेवरचा विश्वास वाढला, केवळ 9 टक्के व्याजदराने शिक्षकांना 12लाखापर्यंत कर्जपुरवठा केला जात आहे. आ सावंत सरांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही पतसंस्थेव्दारे शिक्षकांना आर्थिक दृष्टीने सक्षम बनवले.

एकीकडे शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न सुटत असताना निवृत्ती वेतनाचा प्रश्न जटिल झाला होता. एक नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त शिक्षकांना नवीन अंशदान पेन्शन योजना लागू केली, २००५ पूर्वीच्या नियुक्त काही शिक्षकांना शाळेला शंभर टक्के अनुदान नाही म्हणून जुन्या पेन्शन योजनेतून वगळण्यात आले, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी वेळोवेळी आंदोलने केली, याच प्रश्नासाठी हिवाळी अधिवेशनापूर्वी वर्धा ते नागपूर पायी दिंडी काढली होती, न्यायालयातही धाव घेतली. नक्कीच पुढील काळात आ सावंत सर शासनाला शिक्षकांना जुनी पेन्शन देण्यास भाग पडतील असा विश्वास वाटतो.

आ दत्तात्रय सावंत यांनी सहा वर्षात आमदार म्हणून पुणे विभागातील शिक्षकांनाच नव्हे तर राज्यातील शिक्षकांना न्याय मिळवून दिला आहे, त्यामुळे यापुढे होणाऱ्या पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकित त्यांना अधिक जोमाने काम करण्यासाठी बिनविरोध निवडून द्यावे, जरी कोणी ही विरोधात उभा राहिले तरी आ सावंत पुन्हा एकतर्फी निवडणूक जिंकून सर्वसामान्य शिक्षकांच्या पाठीशी ठामपणे उभा राहतील, येणाऱ्या काळात त्यांना शिक्षण मंत्री म्हणून सेवा करण्याची संधी मिळावी अशी भावना व्यक्त करीत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

कायम विना अनुदानित तत्वावर मान्यता दिलेल्या सहा हजार शाळांचा ‘कायम’ शब्द काढून त्यांना अनुदानावर आणत असताना अनेक जाचक अटी व नियम लावले होते. त्यांना प्रचलित नियमानुसार प्रतिवर्षी २०टक्के अनुदान वाढ करण्याचा २०११ मध्ये झालेला निर्णय बदलून २०१६ ला फक्त २० टक्केच अनुदान दिले गेले, खाजगी अनुदानित शाळा शाळा बंद पाडून खाजगी संस्थांना, कंपन्यांना खुलेआम स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर हजारोंच्या संख्येने शाळांना मान्यता दिल्या. अशा अनेक समस्यामुळे मराठी माध्यमाचा शाळा व शिक्षक संकटात सापडल्या आहेत, त्यांना उर्जित अवस्था मिळवून देऊन शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक काम आ दत्तात्रय सावंत करतील असा विश्वास शिक्षकांमध्ये निर्माण झाला आहे.


जीवाची पर्वा न करता कोरोनाच्या काळातही काम
शासनाच्या वेळकाढूपणाच्या धोरणामुळे विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना 20टक्के अनुदानाचा पहिला टप्पा व 20टक्के अनुदानित शाळेतील शिक्षकांना 40टक्के अनुदानाचा दुसरा टप्पा सतत हुलकावणी देत होता, त्यामुळे शिक्षकांच्या मनात घालमेल होत होती, आ दत्तात्रय सावंत यांनी सहकारी आमदारांना सोबत घेऊन खा शरद पवार , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना सातत्याने भेटून कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव असताना ही जीवाची पर्वा न करता अनुदान देण्यास शासनाला भाग पाडले.

महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या माध्यमातून कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे किट वाटप करीत सामाजिक बांधिलकी जोपासली. आमदार निधी प्रत्येक शाळेपर्यंत देण्याचा प्रयत्न आ सावंत यांनी केला. शिक्षकांना जुनी पेन्शन योजना, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना १०० टक्के अनुदान, कॅशलेस आरोग्य योजना, एक तारखेला पगार, कला व क्रीडा शिक्षक भरती, इ ६ वी ते ८ वी वरील शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी, महाविद्यालयातील प्राध्यापकांना ७१ दिवसाचे वेतन आ दत्तात्रय सावंत हेच नक्की मिळवून देतील असा विश्वास आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!