पुणे विभागात चा चंद्रकांत पाटलांना धोबीपछाड
टीम : ईगल आय मीडिया
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघामध्ये राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. 5 पैकी 4 जागांवर महाविकास आघाडी पुढे असुन एक जागा भाजपने जिंकली आहे तर एका जागी अपक्ष उमेदवार आघाडीवर आहे. विशेष म्हणजे पुणे, मराठवाडा, अमरावती या मतदारसंघात भाजप उमेदवार तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत आहेत असे दिसते.
प्रतिष्ठेच्या पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी चे उमेदवार अरुण लाड हे प्राथमिक अंदाजानुसार सुमारे दहा हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख हे पिछाडीवर आहेत. शिक्षक मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे जयंत आसगावकर हे आघाडीवर असून, दुसऱ्या स्थानावर विद्यमान आमदार आणि अपक्ष उमेदवार दत्तात्रय सावंत हे आहेत.
तिसऱ्या स्थानावर लोकभारती पक्षाचे गोरखनाथ थोरात असून, भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार जितेंद्र पवार चक्क चौथ्या स्थानावर आहेत. शिक्षक मतदारसंघामध्ये आसगावकर यांना आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत पहिल्या पसंतीची १२५४७ मते, तर सावंत यांना ७७२६ मते मिळाली आहेत.
औरंगाबाद: मराठवाडा पदवीधर मतदारसंघातही पहिल्या फेरीची मतमोजणी पूर्ण झाली असून महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना २७ हजार ८७९ मते मिळाली आहेत तर भाजपचे शिरीष बोराळकर यांना १०९७३ मते मिळाली आहेत. सतीश चव्हाण यांनी १६ हजार ९०६ मतांची आघाडी घेतली आहे. अद्याप प्रशासनाकडून याबाबत अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
नागपुरातही महाविकास आघाडी पुढे
नागपूर पदवीधर मतदारसंघात पहिल्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी हे ४ हजार ८५० मतांनी पुढे आहेत. पहिल्या फेरीत वंजारी यांना १२ हजार ६१७ तर भाजपचे संदीप जोशी यांना ७ हजार ७६७ मते मिळाली आहेत. पहिल्या फेरीत एकूण २८ हजार मतांची मोजणी झाली. त्यापैकी २५ हजार ७६६ वैध ठरली तर २ हजार २३४ अवैध ठरली.
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात पहिल्या फेरीत अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांनी ३१३१ मते घेत आघाडी घेतली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे यांना पहिल्या फेरीत २३०० मते मिळाली आहेत तर भाजपचे उमेदवार डॉ. नितीन धांडे यांना फक्त ६६६ मते मिळाली आहेत.