पंढरपूर, सांगोला आणि माढा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे गणित बिघडणार

मोहिते पाटलांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे : जिल्ह्यात भाजपचे राजकीय नुकसान


पंढरपूर : eagle eye news
मोहिते पाटील कुटुंबाने भाजपचे कमळ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची तुतारी हाती घेतल्यास माढा आणि सोलापूर लोकसभा निवडणुकीत परिणाम तर होणार आहेच, शिवाय माढा विधानसभेत अजित पवार गट आणि पंढरपूर विधानसभा निवडणुकीत भाजपचे गणित बिघडणार असल्याचे दिसत आहे.

माढा लोकसभा निवडणुकीत भाजपने उमेदवारी नाकारली, शिवाय विरोध करूनही रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नाराज मोहिते पाटील यांनी भाजप सोडण्याचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
मोहिते पाटील यांच्या या निर्णयाचा भाजपला लोकसभा निवडणुकीत माढा आणि सोलापूर दोन्ही ठिकाणी फटका बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. मात्र याशिवाय आगामी विधानसभा निवडणुकीतही मोहिते – पाटील फॅक्टर अनेक मतदारसंघात भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे गणित बिघडवू शकतो.

माढा विधानसभा मतदारसंघात सध्या अजित पवार गटाचे बबनदादा शिंदे आमदार आहेत. मात्र या मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातील ४२ आणि माळशिरस तालुक्यातील १७ गावे समाविष्ट आहेत. शिवाय माढा तालुक्यातील शिंदे विरोधक नेहमीच मोहिते पाटील यांच्याशी संधान साधून असतात. त्यामुळे माढा विधानसभा निवडणुकीत आ. शिंदे यांची डोकेदुखी वाढणार असून मोहिते पाटील ज्याला पाठबळ देतील त्या शिंदे विरोधी उमेदवाराचा लाभ होण्याची शक्यता आहे.


पंढरपूर आणि मंगळवेढा विधानसभा निवडणुकीत मोहिते पाटील हे निर्णायक स्थितीत असतात. २००९ चा अपवाद वगळता या मतदार संघात नेहमीच मोहिते पाटील ज्याला पाठिंबा देतात तो उमेदवार विजयी झालेला आहे. २०१४, २०२१ पोट निवडणुकीत मोहिते पाटील यांनी भाजपला अपेक्षित नसतानाही राजकीय गणिते जुळवून आणली आणि भाजपला पहिल्यांदाच या मतदारसंघात विजय मिळवता आला. सोलापूर लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातील मोहिते पाटील समर्थक आ.राम सातपुते यांच्या विरोधात नेटाने प्रयत्न करतील असे चित्र आहे.

तसेच अगोदरच आ अवताडे आणि माजी आ.प्रशांत परिचारक यांच्या गटबाजीने ग्रस्त असलेल्या भाजपला विधानसभा निवडणुकीत मोहिते पाटील समर्थक धक्का देऊ शकतात. त्यामुळे मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश भाजपसाठी माढा तसेच सोलापूर लोकसभा आणि माढा, पंढरपूर, सांगोला विधानसभा निवडणुकीत त्रासदायक ठरणार असल्याचे दिसून येते.

सांगोला विधानसभा मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातील १४ गावे समाविष्ट आहेत, या १४ गावात मोहिते पाटील समर्थक निर्णायक संख्येने आहेत, लोकसभा निवडणुकीत शेकापची मदत मोहिते पाटलांना होणार असून विधानसभा निवडणुकीत मोहिते पाटील समर्थक शेकापला मदत करू शकतात, अशा परिस्थितीत अगोदरच काठावर पास असलेले शिंदे सेनेचे आ.शहाजी बापू पाटील यांचे विजयाचे गणित चुकण्याची शक्यता अधिक दिसत आहे

Leave a Reply

error: Content is protected !!