भाजप आमदारांच्या कंपनीकडून राष्ट्रवादीला 5 कोटींचा पक्ष निधी
टीम : ईगल आय मीडिया
राज्यात सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपचे मुंबईतील आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या कंपनीने चक्क 5 कोटी रुपयांचा भला मोठा पक्ष निधी दिला आहे. राष्ट्रवादीने निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या अहवालात याचा उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान दोन वर्षांपूर्वी खडखडाट निर्माण झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस एक वर्षात मालामाल झाला असून पक्षाच्या तिजोरीत एका वर्षात 5 पट इतकी भरघोस रक्कम जमा झाली आहे.
राज्य सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रमुख घटक पक्ष आहे. उपमुख्यमंत्री पदासह अर्थ, नगरविकास, ग्रामीण विकास, आरोग्य,बांधकाम अशी महत्वाची खाती या पक्षाकडे आहेत. त्याचा लाभ होऊन पक्षाच्या तिजोरीत दन दना दन धन जमा होऊ लागले आहे. केवळ गेल्या एका वर्षात त्यापूर्वीच्या तुलनेत 5 पट अधिक पक्ष निधी जमा झाला आहे.
सन 2019 -20 मध्ये 12.5कोटी रुपये निधी पक्षाला मिळाला होता. त्या तुलनेत सत्तेतील सहभागाचा लाभ म्हणून 2020-21 या वर्षात राष्ट्रवादी च्या तिजोरीत 59.94 कोटी रुपये निधी जमा झाला आहे. विशेष म्हणजे 30 हजार रुपयांपेक्षा अधिक देणगी देणाऱ्या दात्यांची नावे कळवणे बंधनकारक आहे.
त्यामुळेच मुंबईतील भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या ‘लोढा डेव्हलपर्स’ या कंपनीने 5 कोटी रुपये निधी दिल्याचे पक्षाच्या अहवालात नमूद केले आहे.
पक्षाचे मुंबई अध्यक्ष मंत्री नवाब मलिक यांनी या वृत्ताला दुजोरा देताना हा हिशोब निवडणूक आयोगाला देण्यात आला असल्याने ही देणगी पारदर्शक असल्याचे सांगितले आहे.
राज्यात भाजप हा एकमेव विरोधी पक्ष असताना त्याच विरोधी पक्षाच्या आमदाराने राष्ट्रवादीला भरघोस निधी दिल्याची चर्चा रंगली आहे.