बोकडाचे जेवण : पॉझिटिव्ह पाहुणे ! दीडशेहून जास्त लोक झाले क्वारंटाईन

पंढरपूर तालुक्यातील खळबळजनक घटना

पंढरपूर : ईगल आय मीडिया
तालुक्यातील भीमा नदीच्या काठावर असलेल्या एका गावामध्ये मागील शुक्रवारी एका कुटुंबात गाव देवाच्या बोकडाचा कार्यक्रम संपन्न झाला. या बोकडाच्या जेवणासाठी दीडशे ते दोनशे लोक आले होते, मात्र त्यापैकी दोन सरकारी पाहुणे व एक सरकारी राखणदार शनिवारी चक्क कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे त्या गावात खळबळ उडाली आहे. बोकड जेवायला गेलेला प्रत्येकजण झाकली मूठ सव्वा लाखाची म्हणत, आपल्या घरात स्वतःहून क्वारंटईन झालेला आहे. तर उशिरा माहिती समजलेल्या आरोग्य विभागाने संबंधित गावात जाऊन अधिकची माहिती घेतली. तसेच बोकडाचा कार्यक्रम केलेल्या कुटुंबाला क्वारंटाईन होण्यास सांगितले आहे.

याविषयीचे सविस्तर वृत्त असे की, पंढरपूर तालुक्यातील भीमा नदी काठी असलेल्या एका गावात शुक्रवारी म्हसोबाला बोकड कापण्यात आला. त्या बोकडाच्या जेवणासाठी निमंत्रण दिलेले दीडशे ते दोनशे लोक घरी येऊन बोकडावर ताव मारून गेले. याच जेवणासाठी शेजारच्या तालुक्यात सरकारी पाहुणे बनून अनेक महिन्यापासून गेलेले दोघेजण व त्याच्या बरोबर एक सरकारी राखनदार आले होते. या सरकारी पाहुणे तसेच ते राखणदार जेवणासाठी ‘ ऑफ द रेकॉर्ड ‘ च आले होते अशी चर्चा आहे.

शनिवारी त्या तिघांचेही कोरोना पॉझिटिव अहवाल आल्यानंतर संबंधित गावात आणि बोकडाचा करेक्ट कार्यक्रम केलेल्या कुटुंबात मोठीच खळबळ उडाली.
पॉझिटिव्ह पाहुणे आलेल्या ठिकाणी आपणही जेवायला होतो हे समजले तर पोलीस आपल्याला उचलून नेतील, 14 दिवस क्वारंटाईन करतील या भीतीने जेवायला गेलेल्या बहुतांश लोकांनी स्वतःहून क्वारंटाईन होण्याचा शहाणपणा दाखवला. रविवारपासून हे लोक घरात बसून आहेत. जेव्हा हा प्रकार ग्रामस्थांना समजला, तेव्हा ग्रामस्थांनीही संबंधित कुटुंबाला क्वारंटाईन होण्याची सूचना दिली. त्यामुळे ते कुटुंब स्वतःहून क्वारंटाईन झालेले आहे.


दोन दिवसानंतर हा सगळा वृत्तांत तालुक्याच्या आरोग्य विभागाला समजला, त्यानंतर सोमवारी गावातील संबंधित लोकांची यादी गोळा करणे, माहिती गोळा करणे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे अधिक कामे सुरू होती. आरोग्य विभागाने संबंधित कुटुंबाला ही सक्तीने क्वारंटाईन होण्याची सूचना केली आहे. अजून तरी त्या गावात कोरोनाचा शिरकाव झालेला नाही, त्यामुळे ग्रामस्थ सावध झालेले आहेत. मात्र अनावधानाने झालेल्या बोकडाच्या जेवणाची आणि आलेल्या पॉझिटिव्ह पाहुुण्याची चर्चा त्या परिसरात रंगली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!