विरोधी गोटात मात्र निवडणुकीची धामधूम
पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुक कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी चे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर होत असलेल्या या निवडणुकीत फारशी संधी नसतानाही विरोधी गोटात निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे.मात्र हक्काची जागा असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये मात्र सामसूम दिसत आहे. राष्ट्रवादी मध्ये मागील आठवड्यात उफाळलेला बंडाचा भडका काही प्रमाणात शमला असला तरी आतून धुमसने कायम असल्याने सुरुवातीला सोप्या वाटलेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादीला घाम गाळावा लागेल असे दिसते.
राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर पंढरपूर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुक होत आहे. आ. भालके यांचे पुत्र आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके किंवा त्यांच्या मातोश्री श्रीमती जयश्री भालके यांच्यापैकी एकास उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त आहे. त्याव्यतिरिक्त राष्ट्रवादीकडे पोटनिवडणुकिसाठी दुसरा प्रबळ उमेदवार नाही. शिवाय भारत भालके यांची लोकप्रियता आणि त्यांच्या निधनानंतर असलेली सहानुभूती लक्षात घेऊन भालके कुटुंबातच उमेदवार असेल हे मानले जात आहे.
मात्र मागील आठवड्यात पंढरपूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पदाच्या निवडीवरून मोठी बंडाळी उडाली आहे. नाराज पदाधिकाऱ्यांनी पक्षाला नारे, इशारे दिले आहेत. त्याच्या जोडीला भगीरथ भालके चेअरमन असलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळातही मोठी नाराजी निर्माण झालेली आहे. विठ्ठल ची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली आहे, शिवाय यंदा गाळप ही अपेक्षित झाले नाही, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिली उचल देण्यासही संचालक मंडळ असर्मथ ठरले आहे. त्याचवेळी कारखान्याने सुमारे 15 कोटी रुपयांची gst भरली नसल्याने सर्व खाती सील करण्यात आली आहेत. त्यामुळे भगीरथ भालके यांच्या बाबत संचालक मंडळ आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांतही नाराजी पसरू लागली आहे.
मतदारसंघात परिस्थिती अशी चिघळत असताना भगीरथ भालके यांचा जनसंपर्क कमी झाल्याचे दिसून येत आहे. दुसऱ्या बाजूला विरोधकाना पोटनिवडणुकीत फारशी संधी दिसत नसतानाही दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन समाधान अवताडे, जि. प. सदस्या शैला गोडसे यांची निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. त्यांनी मतदारसंघात फिरून संपर्क वाढवला आहे. अद्यापही पोटनिवडणुकीबाबत थांबा आणि पहा च्या भूमिकेत असलेल्या परिचारक गटाने ही पोटनिवडणुक लढवण्याची भाषा सुरू केली आहे. पांडुरंग परिवाराच्यावतीने परिचारक कुटुंबातील कोणीही एक उमेदवार द्या, अशी आग्रही मागणी कार्यकर्ते करू लागले आहेत.
तर विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरून भगीरथ भालके यांच्यासंदर्भात नकारात्मक प्रचार सुरू झाला आहे.
या पार्श्वभूमीवर भालके कुटुंबीय आणि तालुक्यातील राष्ट्रवादी मध्ये मात्र निवडणूक संदर्भात सामसूम असल्याचे दिसून येत आहे. येत्या काही दिवसांत विधानसभा पोटनिवडणुक जाहीर होण्याची शक्यता असून त्या दृष्टीने विरोधक जोरदार तयारीला लागले असताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र शांतता असल्याचे दिसून येते. ही शांतता राष्ट्रवादीसाठी अडचणीची ठरण्याची शक्यता दिसून येत आहे.
अभ्यासपूर्ण बातमी, धन्यवाद पोरे साहेब