निवडणूक पंढरपूरची ; जबाबदारी माढयाच्या खासदारांवर
पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक जिंकण्यासाठी भाजपने माढयाचे खासदार रणजितसिंह नाईक – निंबाळकर यांच्यावर सोपवली आहे. विशेष म्हणजे मतदारसंघात ज्या परीचारकांच्या मदतीशिवाय भाजपचा विजय शक्य नाही, त्यांच्यावरच भाजपने अविश्वास दाखवल्याचे मानले जात आहे. दरम्यान, मूळ भाजपच्या नेत्यांना बाजूला सारून आयाराम भाजप नेत्यांवर मतदारसंघाची जबाबदारी भाजप नेतृत्वाने दिल्याचे दिसते. यावरून परिचारक समर्थकांसह भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून येते.
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूकीत भाजपचा सामना राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे. आजवर भाजपला हा मतदारसंघ कधीही जिंकता आलेला नाही. मात्र यावेळी जिंकण्यासाठी मागील दोन निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते घेणाऱ्या प्रशांत परिचारक यांच्या गटाची मदत घेतली आहे. 2019 च्या निवडणुकीत ही दोन नंबरवर असलेला परिचारक गट उमेदवारी साठी प्रबळ दावेदार होता. मात्र भाजपने 2014 आणि 2019 च्या निवडणूकीत 3 ऱ्या नंबरवर राहिलेल्या समाधान अवताडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांना निवडून आणण्यासाठी परिचारक गटाची मदत मिळेल अशी आखणी केली आहे.
मात्र हे करीत असताना भाजपने आ. प्रशांत परिचारक यांना निवडणुकीत केवळ प्रचारकाची जबाबदारी दिली आहे. तर निवडणूक प्रमुख म्हणून निवडणुकीची जबाबदारी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक – निंबाळकर यांच्यावर सोपवली आहे. निंबाळकर हे फलटणचे आहेत, त्यांना पंढरपूर ची मतदार संख्याही माहिती नाही. तरीही त्यांच्यावर निवडणूक जबाबदारी दिली आहे. परिचारक गटाचे नेते उमेश परिचारक यांच्यावर केवळ उमेदवार प्रतिनिधी (ही काय भानगड ?) म्हणून जबाबदारी सोपवली आहे.
खा. निंबाळकर हे चंद्रकांत पाटील समर्थक
खा. नाईक निंबाळकर हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि आ. रणजितसिंह मोहिते – पाटील यांचे समर्थक मानले जातात. तर आ.परिचारक, खा. महास्वामी, आ.सुभाष देशमुख, आ.विजयकुमार देशमुख हे फडणवीस यांच्या गोटातील समजले जातात. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजप नेत्यांवर विश्वास नसल्यानेच एवढ्या मोठ्या निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघाच्या नेत्यांनी लक्ष घातले आहे. आणि आ.परिचारक यांच्या सारख्या मातब्बर स्थानिक नेत्यास दुय्यम भूमिका दिल्याचे बोलले जाते.
म्हणजे मते परीचारकांची आणि निवडणुकीच्या नियोजनाची जबाबदारी फलटण च्या निंबाळकर यांच्यावर दिली आहे. हे समजल्या नंतर परिचारक गटाच्या कार्यकर्त्यातुन नाराजी पसरली आहे. परिचारक यांच्यावर भाजप चा विश्वास नाही असेच यामुळे मानले जात आहे. आणि याचा फटका भाजपच्या उमेदवारास बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सोलापूर चे खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, माजी पालक मंत्री विजयकुमार देशमुख, माजी मंत्री आणि सोलापूर चे माजी खासदार सुभाष देशमुख यांना ही या निवडणुकीत बघ्याची भूमिका दिली आहे. तर दोन वर्षांपूर्वी काँग्रेस मधून भाजपात आलेल्या निंबाळकर यांच्यावर निवडणूक जबाबदारी दिल्याने निष्ठावंत भाजप कार्यकर्ते सुद्धा नाराज आहेत.