पराभूत आणि जेते , पोटनिवडणुकीत जमले नेते

भाजपच्या प्रचारात पराभुतांची मांदियाळी तर राष्ट्रवादी कडे जेत्यांचा थाट !


पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत राज्याच्या विविध भागात परस्परांशी निवडणुकीत लढलेले, कुणी सत्तेचा सोपान चढलेले आणि काही निवडणुकीत पडलेले नेते प्रचारात सक्रिय झालेले आहेत. विशेष म्हणजे, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान अवताडे यांच्या प्रचारासाठी आलेल्या बहुतांश नेत्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झालेला आहे. तर राष्ट्रवादीकडे मंत्री, उपमुख्यमंत्री, विद्यमान आमदार दिसून येतात.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांच्या प्रचारासाठी राज्यभरातील नेते मंडळी येत आहेत. यामध्ये माजी मंत्री बाळा भेगडे, हर्षवर्धन पाटील, राम शिंदे, आ. गोपीचंद पडळकर अशा नेत्यांची भाषणबाजी रंगलेली आहे. अक्कलकोट चे आमदार सचिन कल्यानशेट्टी, आम. प्रशांत परिचारक, रणजितसिंह मोहिते पाटील यांनीही निवडणूक प्रचार जोमाने केला आहे. विशेष म्हणजे यातील राम शिंदे, हर्षवर्धन पाटील, गोपीचंद पडळकर, बाळा भेगडे हे नेते 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले आहेत. 2014 साली अनामत रक्कम गमावलेले प्रा. ढोबळे सुद्धा प्रचारात पुढं असतात.

आ. रणजित मोहिते – पाटील, प्रशांत परिचारक, गोपीचंद पडळकर आजवर लोकांतून निवडून आलेले नाहीत, तर हे नेते विधानपरिषद सदस्य म्हणून नियुक्त झालेले आहेत. खुद्द उमेदवार समाधान अवताडे या पूर्वी दोन वेळा दणकून हरलेले आहेत. त्यामुळे भाजपच्या प्रचारात हरलेल्या नेत्यांची मांदियाळी जमलेली दिसून येते. आणि त्यांच्या भाषणबाजीत, देहबोलीत सुद्धा पराभवाची पडछाया दिसुन येते.


या निवडणुकीत जमून आलेला आणखी एक विलक्षण योग असा की, गोपीचंद पडळकर यांचे डिपॉझिट जप्त केलेले अजित पवार, हर्षवर्धन पाटील यांना सलग दुसऱ्या वेळी हरवलेले पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जयंत पाटील यांच्या मतदारसंघात कायमच पराभूत असलेले सदाभाऊ खोत परस्परविरोधी प्रचार करीत आहेत. आता राम शिंदे यांच्यावर मात केलेल्या आ. रोहित पवार, बाळा भेगडे यांची 90 हजार मतांनी धुळदान उडवलेल्या आ.सुनील शेळके यांना प्रचार सभेसाठी बोलवा अशी मागणी राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांकडून होत आहे.

दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी चे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी सत्ताधारी महाविकास आघाडीचे मंत्री येत आहेत. दीपक साळुंखे, कल्याणराव काळे हे पराभूत नेतेही राष्ट्रवादीच्या प्रचारात दिसून येतात. बाकी उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आ.प्राणितीताई शिंदे, आ.संजय शिंदे यांनी प्रचारात रान उठवले आहे.

यावरून पंढरपूर च्या पोटनिवडणुकीत विजेत्या आणि पराभूत नेत्यांची झुंज रंगली असून जेते राष्ट्रवादी कडे तर पराभूत भाजपकडे असल्याने निवडणूक निकालात जेते परत जेते ठरतात की,पराभूत सगळे मिळून इथं भाजपच्या विजयात खारीचा वाटा उचलून समाधान मानून घेतात ते 2 मे रोजी समजणार आहे. सध्या तरी विजेत्या आणि पराभुतांची झुंज रंगल्याचे दिसते.

Leave a Reply

error: Content is protected !!