पंढरपूर नगरपालिका निवडणूक : महाविकास आघाडीच्या इच्छुकांची अडचण

बहुसदस्यीय प्रभाग झाल्याने निवडणूक जड जाणार

पंढरपूर : ईगल आय मीडिया

नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीत बहु सदस्यीय प्रभाग पद्धतीचा निर्णय घेतल्या नंतर पंढरपूर नगर पालिका निवडणुकीत नशीब अजमावून पाहणाऱ्या इच्छुकांमधून निराशेचे सूर निघू लागले आहेत. विशेषतः विरोधी गटातील इच्छुकांचे नगरसेवक होण्याचे स्वप्न यामुळे धुळीस मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

केवळ 3 महिन्यांवर येऊन ठेपलेल्या नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीत बहु सदस्यीय पद्धत अमलात आणण्याचा निर्णय नुकताच राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे निवडून येण्यासाठी उमेदवारास आपल्या प्रभाव क्षेत्राबाहेर जाऊन प्रयत्न करावे लागणार आहेत. एक सदस्यीय वॉर्ड पद्धतीनुसार निवडणूक झाली असती तर आपापल्या भागात काम करणाऱ्या आणि संपर्क असणाऱ्या इच्छुकांना निवडणूक लढवले सोयीचे होते.

मात्र दोन किंवा 3 वार्डाचा एक प्रभाग केल्यानंतर उमेदवारासाठी प्रचार करणे, प्रचार यंत्रणा राबवणे जिकिरीचे होते. विशेषतः अपक्ष उमेदवारांची यामुळे मोठी गैरसोय होऊन पॅनलच्या उमेदवारांना फायदा होतो. पॅनलच्या उमेदवारांना ही प्रभागात पोहोचणे, प्रचार करणे, खर्चावर नियंत्रण राखणे मुश्कील होऊन जाते. त्यामुळे आपण भले आणि आपला वार्ड भले अशा पद्धतीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना वॉर्ड निहाय झालेली निवडणूक सोयीची असते. त्या बळावर अनेकांना मेम्बर होण्याची स्वप्ने पडतात. मात्र राज्य सरकारने बहुसदस्यीय निर्णय घेऊन अशा हजारो मेम्बर्स च्या आशा धुळीस मिळवल्या आहेत, अशी भावना व्यक्त होत आहे.

पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत आज घडीला सत्ताधारी परिचारक गट एकतर्फी विजयी होणार अशा समजुतीत आहे. आजची राजकीय परिस्थिती तशीच आहे. पंढरपूर नगरपालिकेवर मागील साडेसात वर्षांपासून परिचारक गटाचे वर्चस्व आहे. आणि आज घडीला विरोधात नेमकं कोण लढणार, कसं लढणार हेच स्पष्ट नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर विरोधक एकदम बॅकफूटवर गेले आहेत.

त्यातच पोटनिवडणूकित भाजपने विजय मिळवला आहे. विरोधी राष्ट्रवादी चे दोन्ही साखर कारखाने अडचणीत आहेत, त्यामुळे नेत्यांना नगरपालिका निवडणुकी कडे लक्ष द्यायला वेळ नाही. सध्या परिचारक गटाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. विरोधकांची अवस्था पाहून परीचारकाना आपल्या समोर आव्हान आहे, असे वाटत नाही. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांना आपण मोठ्या फरकाने निवडणूक जिंकू असा विश्वास वाटतो आहे. तर विरोधी गटात अजूनही अनिश्चितता आहे.

या पार्श्वभूमीवर बहु सदस्यीय प्रभाग झाल्याने विरोधी गटाच्या उमेदवारांची मोठी अडचण होणार आहे. परिचारक यांच्या सर्वार्थाने बलाढ्य सत्तेशी अपुऱ्या साधन सामुग्री सह कसे लढायचे ? असा प्रश्न इच्छुकांना पडलेला आहे. वॉर्डानुसार निवडणूक होईल या अपेक्षेने आपापल्या वार्डात दमदार असणारे इच्छुक मोठ्या संख्येने तयारी करीत होते. मात्र बहुसदस्यीय प्रभागाचा निर्णय झाल्याने अशा इच्छुकांच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत. याचा मोठा फटका राष्ट्रवादी,शिवसेना, काँग्रेस या महाविकास आघाडीलाच बसण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!