16 हजार नागरिकांचे केले स्थलांतर : सचिन ढोले
पंढरपूर : ईगल आय मीडिया
अतिवृष्टीमुळे उजनी व वीर धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे, नीरा व भीमा नदी काठी पुरस्थिती निर्माण झाल्याने तालुक्यातील 95 गावांना फटका बसला असून शहरी व ग्रामीण भागासह 4 हजार कुटुंबातील 16 हजार नागरिकांचे प्रशासनाकडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केले असल्याचे प्रांतधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.
अतिवृष्टीमुळे तसेच भिमा व वीर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडल्याने नदी काठी पुरपरस्थिती निर्माण झाली.पुरस्थिती मुळे पंढरपूर तालुक्यातील नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे शहरासह तालुक्यातील 95 गावे बाधित झाली असून, तालुक्यातील 3305 कुटुंबाच्या घरात पाणी शिरले आहे. अतिवृष्टीमुळे पंढरपूर शहरात 6 तर भंडीशेगांव येथील 1 अशा सात नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच तालुक्यातील 440 घरांची पडझड झाली असून 4 बंधाऱ्याचे नुकसान झाल्याचेही प्रांताधिकारी ढोले यांनी सांगितले
शहरातील अंबाबाई पटांगण, व्यासनारायण झोपडपट्टी परिसर, लखुबाई मंदीर परिसर नागरिकांना केंद्रे महाराज मठ, सारडा भवन, तनपुरे महाराज मठ, लोकमान्य शाळा, चैतन्य महाराज मठ,गंगागिरी मठ तसेच पर्यटक निवास येथे सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. या नागरिकांना विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समिती मार्फत भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच तालुक्यातील नागरिकांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, समाज मंदिरे, मंदिरे आदी सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे अशी माहिती ढोले यांनी दिली.