पंढरीत कोरोनाचा वेगवान प्रादुर्भाव : कोविड हॉस्पिटलची वाटचाल कासवगतीने

65 एकरात कोविड हॉस्पिटल : महिनाभराचा लागेल विलंब

पंढरपूर : ईगल आय मीडिया

येथील 65 एकर येथे कोविड हॉस्पिटल उभारण्याचे काम अतिशय कूर्मगतीने सुरू असून हे काम युद्धपातळीवर केले नाही तर आणखी किमान 1 महिना कोविड हॉस्पिटल उभा राहणार नाही असे चित्र आहे.

पंढरपूर येथे स्थानिक प्रशासनाने मोठ्या प्रयत्नाने कोरोना प्रसारावर नियंत्रण राखले आहे. त्यामुळे सध्या पंढरपूर येथे कोविड केअर सेंटर, आयसोलेशन सेंटर, इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन सेंटर उभा करण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर एमआयटी कॉलेज सेंटर व उपजिल्हा रुग्णालय याठिकाणी संशयितांचे swab संकलनाचे ही काम उत्तम प्रकारे होत आहे. त्यामुळे सध्यातरी कोरोनासंबंधी उपलब्ध असलेल्या आरोग्य सुविधांबाबत नागरिक समाधानी आहेत.
मात्र पंढरपूर शहर व तालुक्यात रुग्ण संख्या वाढत असताना नगरपालिका कोविड हॉस्पिटल उभारण्याचे काम अतिशय कूर्मगतीने चालू आहे.

पंढरपूर शहर व तालुक्यातील लोकसंख्या व सध्या होत असलेला कोरोना पॉझिटिव्ह प्रसार पाहता, 100 पेक्षा जास्त खाटांचे कोविड हॉस्पिटल पंढरपूर येथे असणे गरजेचे आहे.
मात्र सध्या 65 एकर येथे नगरपालिकेच्या पुढाकाराने 50 खाटांचे कोविड हॉस्पिटल करण्याचे काम सुरू आहे. काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याने आणखी किमान महिनाभर तरी कोविड हॉस्पिटल सुरू होणे अशक्य दिसते.
पंढरपूर नगरपालिकेने स्वनिधीतून साठ लाख रुपये या हॉस्पिटल साठी खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. पंढरपूर शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 60 वर पोहोचली आहे आणि अनेक नागरिकांचा संपर्क त्यातून झालेले पॉझिटिव रुग्ण याची संख्या वेगाने वाढत आहे.

संसर्गजन्य हॉस्पिटलमध्ये ” समस्यांचा ” सुकाळ !
नगरपालिकेच्या संसर्गजन्य हॉस्पिटलमध्ये सध्या कोरोना संशयित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. याच ठिकाणी swab घेतले जात आहे. परंतु ही इमारत सिमेंट पत्र्याची आणि जुनी असल्याने अनेक ठिकाणी गळती सुरू झाली आहे. रुग्णालय परिसरात गवत मोठ्या प्रमाणात वाढले असून साठलेल्या पाण्यामुळे चिखल झाला आहे. अगदी रुग्णालयाच्या प्रवेश द्वारातून हे पाणी वाहत जाते. त्यातूनच वाट काढत रुग्ण आणि डॉक्टर्सना जावे लागते.
येथील दुरुस्तीसाठी पालिकेला आर्थिक तरतूद करण्यात तांत्रिक अडचणी असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे गैरसोयीने घेरलेल्या संसर्गजन्य रुग्णालयात जीवावर उदार होऊन रुग्ण येतात तर जीव धोक्यात घालून डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी काम करीत आहेत.

पंढरपूर नगरपालिकेने हॉस्पिटल उभारण्याची घोषणा एक महिन्यापूर्वी करून ही प्रत्यक्ष कामाला आता सुरुवात झाली आहे. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव या ठिकाणी दिसून येत आहे. सध्या उपजिल्हा रुग्णालय येथे तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध वार्ड आणि यंत्रणेचा वापर करून गंभीर व संशयित रुग्णांसाठी, पॉझिटिव्ह रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष सज्ज ठेवण्यात येत आहेत. तर नगरपालिकेच्या संसर्गजन्य रुग्णालय येथे तात्पुरत्या स्वरूपात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. मात्र त्याठिकाणी प्रचंड गैरसोयी आहेत, रुग्णांबरोबरच काम करणाऱ्या डॉक्टर्स आणि नर्सेस यांनाही ही जागा सुरक्षित असल्याचे दिसून येते. सध्या पंढरपूर येथील प्रशासनाची ताकद शहरातील सोशल डिस्टंसिंग, बाहेरून येणाऱ्यांचा बंदोबस्त करणे, गर्दी नियंत्रित करणे प्रतिबंधात्मक क्षेत्र जाहीर करून त्या – त्या भागात नागरिकांचा वावर प्रतिबंधित करणे. येणाऱ्या पॉझिटिव रुग्णांचे संपर्क शोधून काढणे यातच वेळ आणि कार्यक्षमता खर्ची जात आहे. पंढरपूर येथील कोविड हॉस्पिटल उभारण्याचे काम रखडले आहे.आता शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्यामुळे युद्धपातळीवर प्रयत्न करून हॉस्पिटल उभा करण्याची गरज आहे . मात्र सध्यातरी त्यादृष्टीने प्रयत्न होत असल्याचे दिसत नाहीत.

Leave a Reply

error: Content is protected !!