सिद्धेश्वर अवताडे निवडणूक लढवण्यावर ठाम !

मोहिते पाटील यांची शिष्टाई निष्फळ

मंगळवेढा : ईगल आय मीडिया

जेष्ठ नेते विजयसिंह मोहिते -पाटील आणि आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांची बबनराव अवताडे यांच्याकडे केलेली शिष्टाई निष्फळ ठरली आहे. यावरून पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून दाखल केलेली उमेदवारी कायम ठेवण्यावर सिध्देश्वर अवताडे ठाम असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजप उमेदवार समाधान अवताडे यांच्या पुढील अडचणी वाढल्या आहेत.

पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी दाखल अर्ज काढून घेण्यासाठी आता एक दिवसाचा अवधी उरला आहे. 3 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज माघारी घेतले जातील. त्यामुळे आपापल्या अडचणीचे उमेदवार बाजूला काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांच्यासाठी सिद्धेश्वर अवताडे यांचा उमेदवारी अर्ज अडचणींचा ठरणार आहे. समाधान आवताडे यांचे चुलते बबनराव आवताडे यांचे चिरंजीव सिद्धेश्वर आवताडे हे निवडणूक लढविण्यावर ठाम असून त्यांनी अर्ज दाखल केल्याने मतदारसंघात अवताडे यांची डोकेदुखी वाढली आहे.

विविध कार्यकारी सोसायट्या, तालुका खरेदी विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती आदी संस्थांवर एकहाती वर्चस्व असणारे बबनराव आवताडे तालुक्यातील सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते आहेत. बबनराव आवताडे यांचे सुपुत्र सिद्धेश्वर आवताडे हे विधानसभेच्या आखाड्यात आल्याने  समाधान आवताडे यांची राजकीय अडचण वाढली आहे. ग्रामीण भागात बबनराव आवताडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेपासून बबनराव आवताडे हे संचालक आहेत. बबनराव आवताडे यांच्या राजकीय ताकदीचा अंदाज मोहिते कुटुंबाला असल्याने अकलूज वरून मंगळवेढ्याला येत त्यांनी बबनराव आवताडे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी बबनराव आवताडे यांच्याशी विजयसिंह मोहिते – पाटील आणि आ रणजीतसिंह मोहिते- पाटील यांनी देखील बंद दाराआड दोन तास चर्चा केली. मात्र मिळालेल्या माहितीनुसार या चर्चेतून मार्ग निघाला नसून सिद्धेश्वर अवताडे हे निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याचे समजते. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असलेल्या समाधान आवताडे यांच्या विजयात येणारे अडथळे दूर करण्यासाठी विजयसिंह मोहिते-पाटील व रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी गुरुवारी केलेल्या शिष्टाईला यश मिळाले नसल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे.

सिद्धेश्वर अवताडे यांनी अर्ज मागे घ्यावा म्हणून शिष्टाई करण्यासाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व भाजपचे नेते विजयसिंह मोहिते-पाटील, आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी मंगळवेढा येथील बबनराव आवताडे यांच्या संपर्क कार्यालयात त्यांची भेट घेतली. राजकीय घडामोडी वर चर्चा केली. या चर्चेत त्यांनी अर्ज मागे घ्यावा अशी विनंती करण्यात आली असल्याचे समजत असले तरी बबनराव आवताडे यांनी याला अनुकुलता दर्शवली नसल्याने सिद्धेश्वर आवताडे निवडणुकीच्या रिंगणात कायम राहणार अशी शक्यता निर्माण झाली आहे

Leave a Reply

error: Content is protected !!