परिचारक यांच्याकडून पुन्हा घरवापसीचे संकेत
पंढरपूर : ईगल आय न्यूज
भाजप नेते माजी आ. प्रशांत परिचारक यांच्या गटाच्या आघाडीच्या अर्धा डझन नेत्यांचे शिष्टमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस ( एस पी). चे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या भेटीसाठी बार्शी येथे गेले आणि पवारांची भेट घेऊन आले. परिचारक यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केलेली असताना परिचारक समर्थक नेत्यांचे शिष्टमंडळ खा. पवारांना भेटल्यामुळे पंढरपूर – मंगळवेढा तालुक्यात वेगळीच चर्चा सुरू झालेली आहे.
विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झालेली आहे, प्रत्येक राजकीय नेत्यांच्या हालचालींवर राजकीय पक्ष आणि गटाचे नेते बारीक लक्ष ठेवून आहेत. नेत्यांच्या राजकीय हालचाली त्यांच्या वक्तव्याचे, कार्यक्रमांचे वेगवेगळे तर्क लावून राजकीय व्युव्हरचना केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपूर – मंगळवेढा तालुक्यातील भाजप नेते आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या गटाच्या निर्णय प्रक्रियेत असणाऱ्या पंढरपूर अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश मुळे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसाट, रा.पा. कटेकर, संजय अभ्यंकर, मनोज सुरवसे आदी अर्धा डझन नेत्यांनी शनिवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांची बार्शी येथे माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
त्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याची वस्तुनिष्ठ माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र या शिष्टमंडळाने खा. पवार यांच्याकडे प्रशांत परिचारक यांच्या उमेदवारीची मागणी केल्याचे समजते. प्रशांत परिचारक यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचे जवळपास निश्चित केलेले आहे. मात्र भाजपकडून विद्यमान आ.समाधान अवताडे यांनाच उमेदवारी मिळेल असे स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे परिचारक यांच्याकडून पुन्हा घरवापसीचे संकेत दिले जात आहेत.
सुभाष भोसले हे कट्टर परिचारक विरोधक
स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्यापासून ते प्रशांत आणि उमेश परिचारक यांच्याशीही माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले यांचे राजकीय हाडवैर आहे. राजकीय आणि आर्थिक नुकसान सहन करूनही सुभाष भोसले यांनी शहरात नेहमीच परिचारक विरोधी भूमिका घेतलेली आहे. अशा कट्टर विरोधक असलेल्या सुभाष भोसले यांना उमेदवारी देण्याची मागणी कट्टर परिचारक समर्थक करून आले हा दावा हास्यास्पद मानला जात आहे. मात्र परिचारक समर्थकांच्या पवार भेटीचे राजकीय अर्थ वेगळेच काढले जात आहेत.
यापूर्वी पंढरपूर तालुक्यातील विविध पातळीवर झालेल्या परिचारक समर्थकांच्या बैठकांमध्ये तुतारी हाती घेऊन विधानसभा लढण्याची मागणी झालेली आहे. परिचारक गट गेल्या १० वर्षांपासून पवारांकडून दूर आहे, मात्र या काळात परिचारक गटाला विधानसभेला अपयश आलेले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पवांरांसोबत जाऊन आमदारकी मिळवू अशा आशावाद व्यक्त होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी हे शिष्टमंडळ पवारांना भेटल्याचे सांगितले जाते. दरम्यान यासंदर्भात पंढरपूर अर्बन बँकेचे चेअरमन सतीश मुळे यांच्याशी संपर्क साधला असता माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले यांना उमेदवारी देण्याची मागणी केल्याचे सांगितले. सुभाष भोसले हे पवारांशी निष्ठावंत आहेत, त्यांना उमेदवारी दिल्यास आम्ही सहकार्य करू असेही सांगितल्याचे मुळे म्हणाले.