एकानेच भरला संपूर्ण गावाचा शेतसारा

पटवर्धन कुरोली : इंग्रज राजवटीत पणजोबांनी भरला होता गावचा शेत सारा

गावाच्या शेतसाऱ्याची मंडल अधिकारी बाळू औसकर यांच्याकडे रक्कम देताना प्रसाद उपासे, मोहन उपासे, उत्तम नाईकनवरे, विक्रम उपासे आदी.

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पटवर्धन कुरोली (ता. पंढरपूर) येथील शेतकरी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक मोहन नामदेव उपासे यांनी पटवर्धन कुरोली गावचा पूर्ण १९०० हेक्टर क्षेत्राचा शेतसारा एकट्यानेच भरला आहे. सुमारे 120 वर्षांपूर्वी त्यांच्या पणजोबांनी इंग्रज काळात दाखवलेल्ल्या औदार्याची आठवण करून दिली आहे. त्यांच्या पणजोबांनी ही गावचा संपूर्ण शेतसारा भरून इंगज सरकारच्या पठाणी वसुली पासून गावातील शेतकऱ्यांचे संरक्षण केले होते.

इंग्रज राजवटीत शेतसारा भरला नाही म्हणून इंग्रजांनी गावावर जप्तीची कारवाई सुरू केली होती. त्यावेळीही त्यांच्या पूर्वजांनीही स्वत: शेतसारा भरून गावाची मुक्तता केली होती. यावेळीही पूर्वजांनी केलेले काम पुढेही सुरू ठेवावे म्हणूनच आपण स्वत:हून शेतसारा भरल्याची प्रतिक्रिया मोहन उपासे यांनी दिली.

त्यांच्या पूर्वजांनीही ज्यावेळी चांदीची नाणी होती, त्यावेळी इंग्रज राजवटीत पडलेल्या दुष्काळावेळी शेतसारा भरणे सर्वसामान्य शेतकऱ्यांना शक्य नव्हते. इंग्रजांनी आणलेल्या जप्तीची कारवाई थांबविण्यासाठी त्यांनी स्वत: पूर्ण गावाचा शेतसारा भरून गावकऱ्यांची जप्तीची मोहिम टाळली होती.

त्यानंतर बऱ्याच वर्षांनी पूर्वजांनी केलेले काम पुढे चालू राहावे म्हणून आपणही गावाचा शेतसारा भरण्याची इच्छा होती. मात्र अनेकदा आलेल्या विविध अडचणींमुळे ते शक्य होत नव्हते. यावर्षी शेतसारा भरण्याचे नक्की ठरविले होते. मात्र मध्यंतरी आलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमुळे तो निर्णय पुढे ढकलला.

ग्रामपंचायत निवडणुकीअगोदर शेतसारा भरला असता तर तो राजकीय इव्हेंट झाला असता. त्यामुळे निवडणूका झाल्यानंतर शेतसारा भरण्याचे नक्की केले व आता कोणताही मोठा कार्यक्रम, गाजावाजा न करता मंडल अधिकारी, तलाठी व महसूलच्या कर्मचाऱ्यांना घरी बोलावून मोहन उपासे यांनी पटवर्धन कुरोली येथील १९०० हेक्टरचा शेतसारा रोख स्वरूपात प्रशासनाच्या स्वाधीन केला आहे.

यावेळी मंडल अधिकारी बाळू औसेकर, तलाठी जी. बी. गवळी, विठ्ठलचे संचालक उत्तमराव नाईकनवरे, माजी संचालक मोहन उपासे, विठ्ठल उपासे, हनुमंत नाईकनवरे, गणेश उपासे, विक्रम उपासे, भागवत उपासे, नागनाथ मुंगूसकर, ज्ञानेश्वर उपासे, प्रसाद उपासे, समाधान उपासे, इकबाल शिकलकर, काकासाहेब उपासे, व्यंकटेश उपासे, सुरेश उपासे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!