ढोबळे सरांचा शाहू परिवार राष्ट्रवादीच्या पाठीशी

ढोबळे सर इकडं आणि शाहू परिवार तिकडं

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत माजी मंत्री प्रा लक्ष्मण ढोबळे हे जरी भाजपच्या प्रचारात असले तरी त्यांच्या कन्येसह संपूर्ण शाहू परिवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारात आहे. त्यामुळे ढोबळे सर इकडे आहे शाहू परिवार तिकडे अशी भाजपसाठी परिस्थिती निर्माण झाली आहे.

संपूर्ण हयात सेक्युलर राजकारणात घालवताना ज्या भाजप, संघ परिवारावर प्रा.लक्ष्मण ढोबळे तुटून पडत होते आयुष्याच्या उत्तरार्धात मात्र भाजपच्या प्रचारात मग्न आहेत. त्यांच्या या भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सध्या सुरू असलेल्या पोटनिवडणुकीत प्रा. ढोबळे यांनी भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांच्या बाजूने उडी घेतली आहे. प्रा ढोबळे प्रचाराला आले असले तरी त्यांचे कार्यकर्ते, त्यांची बहुजन रयत परिषद आणि शाहू शिक्षण संस्था, त्या संस्थेतील कर्मचारी हे मात्र राष्ट्रवादी च्या प्रचारात होते.

शाहू शिक्षण संस्थेच्या अध्यक्षस्थानी सध्या प्रा. ढोबळे यांचे जावई अब्राहम आवळे हे आहेत. त्यांचे बंधू माजी आमदार राजीव आवळे यांनी 2 महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहेत. त्याचेवळी अब्राहम आवळे आणि त्यांच्या पत्नी व ढोबळे यांच्या कन्या क्रांती आवळे यांनीही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. राजीव आवळे यांनी राष्ट्रवादी च्या प्रचारासाठी पंढरपूर, मंगळवेढा येथे सभाही घेतल्या आहेत.

4 दिवसांपूर्वी शाहू शिक्षण संस्थेच्या शाहू परिवाराच्या पंढरपूर येथील बैठकीत शेकडो कर्मचाऱ्यांना, शाहू परिवाराच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसला सहकार्य करण्याचे आवाहन ही त्यांनी केले आहे.

त्यानुसार संपूर्ण शाहू परिवार राष्ट्रवादी च्या प्रचारात आहे. त्याच बरोबर ढोबळे यांच्या बहुजन रयत परिषदेच्या सर्व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी चा प्रचार केला आहे.यावरून प्रा. लक्ष्मण ढोबळे भाजपच्या प्रचारात आणि त्यांच्या शाहू परिवारासह बहुजन रयत परिषद ही राष्ट्रवादी च्या प्रचारात असल्याचे विरोधाभासी चित्र दिसून आले आहे. यामुळे भाजपला मात्र मोठा फटका बसणार असल्याचे मानले जाते.

Leave a Reply

error: Content is protected !!