पुणे पदवीधर : निवडणूक रंगतदार अवस्थेत

महाविकास आघाडी – भाजपच्या प्रतिष्ठेची लढत

टीम : ईगल आय मीडिया

पुणे पदवीधर मतदारसंघातील निवडणूक मोठी रंगतदार झाली असून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप ने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असल्याने स्थानिक पातळीवरील निवडणुकी सारखी 5 जिल्ह्यातील पदविधरांची निवडणूक रंगली आहे. या निवडणुकीत जरी 60 पेक्षा जास्त उमेदवार असले तरीही महाविकास आघाडीचे अरुण लाड, भाजपचे संग्राम देशमुख, अपक्ष डॉ. श्रीमंत कोकाटे यांच्यातच मुख्य लढत रंगली आहे.

भाजपचे या जागेवर गेल्या 30 वर्षांपासून वर्चस्व असले तरी दरवेळी विरोधी मतांमधील विभागणीमुळे भाजपला विजयाची परंपरा कायम राखता आली. मात्र यावेळी विरोधकांनी मतविभागणी टाळण्यात बऱ्या पैकी यश मिळवले आहे, तसेच श्रीमंत कोकाटे यांच्या रूपाने विरोधकांची मते विभागणी करणारा एक उमेदवार रिंगणात असला तरी त्यांचे ही मतदार दोन क्रमांकाची पसंती मते महाविकास आघाडी च्या उमेदवारास करतील असे चित्र दिसत आहे.

त्यातच शरद पाटलांचा अपवाद वगळता 30 वर्षांपासून मतदारसंघात वर्चस्व असूनही भाजपच्या आमदारांनी पदवीधरांसाठी ठोस काहीही केलेले नाही, शिवाय यावेळी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि इतर भाजप विरोधी विचारांच्या संघटना सामील झालेल्या आहेत. गेल्या 6 वर्षात चंद्रकांत पाटील हे मतदारसंघाचे प्रतिनिधी होते आणि सत्तेत 2 नंबरचे पद असूनही त्यांनी पदवीधरांकडे साफ दुर्लक्ष केले, तसेच सत्तेत असताना चंद्रकांत पाटील यानी या 5 जिल्ह्यात सर्वच राजकीय नेत्यांना मोठा उपद्रव दिला आहे त्यामुळे त्यांच्याविषयी मनात राग असलेले नेते महाविकास आघाडी च्या प्रचारात दिसत आहेत.

तर दुसऱ्या बाजूला भाजपने यावेळी पारंपरिक चौकट मोडून साखर कारखानदार असलेला सांगली जिल्ह्यातील च उमेदवार दिला आहे, संग्राम देशमुख हे सांगली जिल्हा परिषदेत भाजपचे अध्यक्ष होते, तसेच पलूस कडेगाव मतदारसंघात विद्यमान मंत्री विश्वजित कदम यांचे ते पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत. राष्ट्रवादी चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यांच्या आग्रहाखातर जेष्ठ नेते अरुण लाड यांना उमेदवारी दिली आहे.

सांगली जिल्ह्यात लाड यांच्यासाठी 5 आमदार झटत आहेत, कोल्हापूर जिल्ह्यातील 6 आमदार, शिवसेनेचे 2 खासदार, स्वाभिमानी शेतकरी संघटना लाड यांच्याच प्रचारात आहे. त्यामुळे सांगली, कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यात महाविकास आघाडीचा जोर दिसून येतोय. सातारा जिल्ह्यात भाजपची ताकद यावेळी वाढली आहे, खासदार उदयनराजे भोसले आणि 2 आमदार देशमुख यांच्या प्रचारात आहेत. पुणे जिल्हा हा भाजपचा पदवीधर मध्ये बालेकिल्ला ठरलेला आहे. आजवर पुण्यातील मताधिक्यावरच भाजप जिंकत आलेला आहे, मात्र पुणे जिल्ह्यात ही यावेळी समीकरणे बदलली असल्याचे दिसते. पुणे ग्रामीण भागात वाढलेले मतदार कुणीकडे झुकतात यावरच पुणे जिल्ह्यातील निवडणूक निकाल अवलंबून आहे.

सोलापूर जिल्ह्यात ही महाविकास आघाडीने जोर लावला असला तरी या जिल्ह्यात श्रीमंत कोकाटे प्रभावी ठरत आहेत, शिवाय मोहिते पाटील, परिचारक यांचे प्रबळ गट भाजपच्या देशमुखांसाठी प्रयत्न करीत आहेत, शिवाय भाजपचा पारंपरिक मतदार जिल्ह्यात आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात भाजप आणि महाविकास आघाडीत जोरदार लढत होत आहे. श्रीमंत कोकाटे प्रथम पसंतीची किती मते खेचून घेतात यावर या जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे भवितव्य अवलंबून आहे.

कागदावर पुणे , सातारा जिल्ह्यात भाजपचे प्राबल्य दिसत आहेत तर कागदोपत्री सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडी प्रबळ असल्याचे चित्र आहे. सोलापूर जिल्हा यावेळी निर्णायक ठरणार असल्याचे दिसत आहे. एकूणच पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघात मोठ्या चुरशीची लढत होत आहे. कोरोनाच्या काळात पदवीधर मतदार किती प्रमाणात बाहेर पडतात, राजकीय प्रभावाखाली येतात की आपल्या प्रश्नांना प्राधान्य देऊन मतदान करतात यावर निवडणुकीचे गणित सुटणार आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!