पाटलांनी मोहोळचे वैभव संपुष्टात आणले : राजाभाऊ खरे यांची टीका

कोणतेही पद नसताना मतदारसंघात ५० कोटी रुपयांची कामे केली : १५ टॅन्करने ७० दिवस पाणी पुरवठा केला.

पंढरपूर : प्रतिनिधी
माझ्याकडे कोणतेही संविधानिक पद नाही, तरीपण मी माझे मुख्यमंत्री आणि मंत्रालय पातळीवर असलेले संबंध वापरून मोहोळ विधानसभा मतदारसंघात ५० कोटी रुपयांची विकास कामे केली. मात्र ज्यांनी आजवर मोहोळवर तीनवेळा गेटकेन उमेदवार लादले त्यांनी अप्पर तहसील, हॉस्पिटल, निबंधक कार्यालय अशी महत्वाची कार्यालये अनगरला पळवून मोहोळचे वैभव संपुष्टात आणल्याची टीका उद्योजक राजाभाऊ खरे यांनी पंढरपुरात पत्रकार परिषदेत केली.

उद्योजक आणि मोहोळ विधानसभा निवडणुक लढवण्याची तयारी गेल्या काही वर्षांपासून करीत असलेल्या राजाभाऊ खरे यांनी आज पंढरपूर मध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले कि, पंढरपूर तालुक्याचे चार विधानसभा मतदारसंघात तुकडे झाले, त्यातील १७ गावे मोहोळ ला जोडली गेली त्यामुळे मी या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची निश्चित केलेले आहे. यापूर्वी तीनवेळा मोहोळवर गेटकेन उमेदवार लादला गेला. मात्र आपण याच मतदारसंघातील असल्याने भूमिपुत्र म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहोत. २०१७ पासूनच मी २०२४ ची निवडणूक लढवण्याची नियोजन केले होते. आजवर मोहोळ तालुक्यातील केवळ अनगर आणि बारा वाड्या यांचाच विकास करण्याचा प्रयत्न केला गेला.

मोहोळ तालुक्यातील इतर गावे आजही रस्ते, पिण्याचे पाणी,आरोग्य सुविधा, शाळा खोल्या अशा सुविधांपासून वंचित आहेत. माझ्याकडे कोणतेही पद नसताना मी मोहोळ मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांच्या मदतीने विविध मंत्र्यांकडून ५० कोटींचा निधी मोहोळ मतदारसंघात आणला आहे. संदीपान भुमरे मंत्री असताना त्यांच्याकडून पाणंद रस्त्यांसाठी 25 कोटी रुपये निधी आणला. समाज कल्याण मधून ६ कोटी याशिवाय रस्ते, शाळा खोल्या, पिण्याचे पाणी, समाज मंदिर, दलीत वस्ती सुधार योजना, २५ /१५ अशा योजनांतून निधी आणला.

अजित पवारांमुळे महायुतीचे प्रचंड नुकसान
अजित पवारांना सत्तेत घेन्यामुळेच महायुतीचे प्रचंड नुकसान झाले असल्याचा आरोप करून खरे पुढे म्हणाले कि, उद्धव ठाकरे सरकारच्या काळात अजित पवार शिवसेनेच्या आमदारांना निधी देत नव्हते, म्हणून शिवेसनेत उठाव झाला आणि परत त्याच अजित पवारांना सोबत घेतले हे चुकीचे झाले. म्हणून लोकसभेला महाविकास आघाडीला ३१ जागा मिळाल्या. अनगरचे अप्पर तहसील कार्यालय हलवण्यास सर्वात अगोदर मी विरोध केला. विजयराज डोंगरे, उमेश पाटील, मानाजी माने आदी नेत्यांना सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटलो. 40 गावांची गैरसोय होईल त्यामुळे हे कार्यालय स्थलांतरित होऊ नये अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी अहवाल मागवू म्हणत तात्पुरती स्थगितीहि दिली होती, मात्र त्याच रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी आ. राजन पाटील, आ. यशवंत माने यांनी रात्री एक वाजता वर्षा वर जाऊन मुख्यमंत्र्यांना या कार्यालयासाठी सरकारमधून बाहेर पडण्याची धमकी दिली होती, त्यामुळे मुख्यमंत्र्यांना स्थगिती आदेश काढता आला नाही, असा सनसनाटी आरोपही खरे यांनी केला.

मोहोळसह तालुक्याच्या दक्षिण भागातील ५२ गावे, उत्तर सोलापूर ची २४ गावे, पंढरपूर ची १७ अशा सर्व भागात विकास कामे केली. गेल्यावर्षी दुष्काळी परिस्थिती असताना मोहोळ मतदारसंघात १५ टॅन्करने ७० दिवस पाणी पुरवठा केला.याउलट राजन पाटलांनी आजवर मोहोळ मधील शासकीय कार्यालये पळवली नुकतेच अप्पर तहसील कार्यालय पळवले,त्यापूर्वी १०० खाटांचे हॉस्पिटल नेले, जनावरांचा बाजार नेला, दुय्यम निबंधक कार्यालय नेले, त्यामुळे मोहोळ शहराचे अस्तित्व आणि बाजारपेठ मोडीत काढण्याचे, शहराचे वैभव संपुष्टात आणण्याचे काम केले असल्याचा आरोपही खरे यांनी केला.

Leave a Reply

error: Content is protected !!