सचिन 14 दिवसांनी ट्विटरवर आला, तरीही ट्रोल झाला

जय शाह ने ट्विटर चा पासवर्ड दिला काय ? ट्रोलर्स चा सवाल

टीम : ईगल आय मीडिया

भारतरत्न सचिन तेंडुलकर शेतकरी आंदोलना संदर्भात 3 फेब्रुवारी रोजी ट्विट केल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. त्यानंतर मात्र सचिन ट्विटर वरून गायब झाला होता. काल 17 फेब्रुवारी रोजी त्याने ट्विटर वर पुन्हा हजेरी लावली मात्र ट्विटर युजर्स ने त्याला पुन्हा ट्रोल केले आहे. यावरून क्रिकेटच्या देवावरील भक्तांचा राग अजूनही कमी झाला नसल्याचे दिसते.

सचिन तेंडुलकर हा जगभरात क्रिकेट चा देव मानला जातो. ट्विटर वर यायचे सुमारे 35 लाख फारलोअर्स आहेत, आणि दररोज तो क्रिकेटशी संबंधित काही ना काही ट्विट करीत असतो. 3 फेब्रुवारी रोजी असेच एक ट्विट त्याने शेतकरी आंदोलनावर पॉप सिंगर रिहाना च्या संदर्भात केले होते. त्यानंतर मात्र सचिन प्रचंड ट्रोल झाला. त्याला संघी ठरवण्यापासून ते त्याच्या शेतकरी आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्यापर्यंत विविध विषयांवर त्याला ट्रोल केले. सचिनने शेतकरी आंदोलनाची दखल घेतली नाही,मात्र bcci, अंबानी यांच्याकडून ईशारा येताच त्याने ट्विट केल्याचा आरोप केला जाऊ लागला.

दरम्यानच्या काळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रवक्ते रणजित बागल यांनी सचिनच्या घराबाहेर जाऊन ” शेतकरी बापासाठी कधी ट्विट करशील ?” असाही जाब विचारला होता. मात्र त्यानंतर ही सचिन ट्विटरवर दिसला नाही.

16 फेब्रुवारी रोजी चेन्नईत झालेल्या भारत – इंग्लंड क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या आर अश्विन ने शतक झळकावले त्याच्या या कामगिरीचे कौतुक करणारे ट्विट काल 17 फेब्रुवारी रोजी सचिनने केले. ट्विटरवर दर रोज दिसणारा सचिन गेल्या 14 दिवसांत गायब होता आणि शेतकरी आंदोलनाचे वातावरण थंड होताच तो ट्विटरवर परतला मात्र तरीही त्याला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.

यावेळी शेतकरी आंदोलन, महिला क्रिकेट, वसीम जाफर या प्रकरणावरून ट्रोल करण्यात आले आहे. जय शाह ने ट्विटर चा पासवर्ड दिला काय ? अशी विचारणा एकाने केली आहे. तर एकाने वसीम जाफर तुझा संघ सहकारी होता त्याच्या बाजूने का ट्विट केले नाही असेही विचारले आहे. भारत आणि इंग्लंड संघातील हा विषय असून बाहेरील व्यक्तीने ( सचिनने) यामध्ये हस्तक्षेप करू नये असे एकाने म्हटले आहे.

तर आर अश्विनने शतक झळकावले हा त्याचा अंतर्गत मामला असून सिराज ने यामध्ये सामील होऊ नये, असा टोमणा एकाने लगावला आहे. जेव्हा भाजप आय टी सेलने फॉरवर्ड करते तेव्हा तो मेसेज सचिन कॉपी पेस्ट करतो असेही एकाने म्हटले आहे. संघाच्या कामगिरीत लक्ष देऊ नको, जय शहा शी संपर्क साधून उद्या आपल्या मुलास संघात घेण्यासाठी प्रयत्न कर, असेही एकाने सुनावले आहे.

एकूणच सचिन तेंडुलकर फालोअर्स च्या ट्रोलिंग मुळे 14 दिवस ट्विटर पासून बाजूला होता मात्र त्याच्या परतण्याची प्रतीक्षा करणाऱ्या ट्विटर्स नी सचिनला जोरदार ट्रोल केले आहे. त्यामुळे त्याने दुसऱ्या दिवशी अजून तरी ट्विट केलेलं नाही.

Leave a Reply

error: Content is protected !!