St बसवरील विठ्ठल प्रतिमेचे दर्शन घेणाऱ्या महिलेस मंदिर समितीने घडवले विठ्ठल दर्शन
पंढरपूर : ईगल आय मीडिया
काही दिवसा पुर्वी व्हाट्सएप- फेसबुकवर एक पोस्ट व्हायरल झाली होती ज्या मध्ये एक महिला सईबाई प्रकाश बंडगर ( मु.पो.रामहिंगणी ता.मोहोळ जि.सोलापूर ) या विठाई बस वरील श्री विठ्ठलाच्या प्रतिमेचे दर्शन घेताना दिसत आहेत. त्या महिलेचा पत्ता सापडताच विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने त्यांना मंदिरात बोलावून घेतले आणि देवाचे मुखदर्शन देऊन त्यांचा सन्मान ही केला.
साक्षात विठ्ठलाने बोलावले ! सईबाई बंडगर यांनी मोहोळ बस स्थानकावर उभ्या st बसवरील छायाचित्रात विठ्ठल पाहिला आणि त्याचेच दर्शन घेऊन समाधान साधले, मात्र भोळ्या भक्तीच्या भुकेल्या विठ्ठलास या महिलेची भक्ती आवडली आणि त्यानेच महिलेस बोलावून घेतले व दर्शन दिले असे मानले जात आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देताना मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी राज्य परिवहन महामंडळाच्या बसवर रंगवण्यात आलेल्या विठ्ठलाच्या प्रतिमेचे एक महिला डोके टेकवून दर्शन घेत असल्याचा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. ह.भ.प.रामकृष्ण महाराज वीर यांनी त्या महिलेस ओळखले व मंदिर समितीला कळवले.
समितीच्या वतीने लागलीच त्यांना मंदिरात बोलावून घेतले आणि त्यांना खऱ्या खुऱ्या विठ्ठलाचे मुखदर्शन घडवले. सध्या कोरोनामुळे सर्वच भाविकांना मुखदर्शन दिले जाते म्हणून या महिलेस ही मुखदर्शन देण्यात आले. तसेच मंदिर समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. मंदिर समितीच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असून st बसवरील विठ्ठलाच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन विठ्ठल भेटीचे समाधान साधणाऱ्या त्या महिलेस साक्षात विठ्ठलानेच बोलावून घेतल्याचे मानले जात आहे.
चांगली बातमी