आरक्षण आणि सरपंच निवडी अधांतरी : सोमवारी चित्र स्पष्ट होण्याची अपेक्षा
सोलापूर : ईगल आय मीडिया
जिल्ह्यातील 5 ग्रामपंचायतीचे सरपंच आरक्षण सोडत काढताना अनियमितता झाल्याने उच्च न्यायालयात प्रकरण गेले आणि, उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार 16 फेब्रुवारी पर्यंत सरपंच निवडीला स्थगिती दिली गेली आहे.मात्र 9, 11 आणि 13 रोजी होणाऱ्या सर्वच ग्रामपंचायत सरपंच निवडीला स्थगिती दिली जाणार की फक्त त्या 5 ग्रामपंचायतींना हे अद्यापही स्पष्ट झाले नाही. तांत्रिक बाबींचा अभ्यास करून सोमवारी याबाबत जिल्हाधिकारी कळणार आहेत. तोपर्यंत 9 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सरपंच निवडीबाबत इच्छुकांसह गाव करभाऱ्यांचेही जीव टांगणीला लागले आहेत.
दरम्यान, संपूर्ण जिल्ह्यातील सरपंच निवडीबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली असून गावोगावी संशयकल्लोळ निर्माण होऊन सदस्यांना सहलीवर पाठवण्यात येत आहे. त्यामुळे जर सरपंच निवडी पुढे गेल्यास फोडाफोडीला आणखी वाव मिळेल तर इच्छुक सरपंचाच्या खिशाला आणखी भुर्दंड बसणार आहे. त्यामुळे गावोगावी अस्वस्थता निर्माण झाली आहे.
त्यामुळे आता सोलापूर जिल्ह्यातील फक्त ‘ त्या ‘ 5 गावचे आरक्षण बदलणार की रोटेशन नुसार प्रभावित होणाऱ्या शेजारील गावचे ही आरक्षण बदलणार ? तसे झाले तर 9, 11 आणि 13 रोजी होणाऱ्या सरपंच निवडीचे काय ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या बाबत कायदेशीर तज्ज्ञांचा सल्ला घेऊन उद्या ( 8 फेब्रुवारी ) रोजी जिल्हाधिकारी शंभरकर याबाबत योग्य तो निर्णय देतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सर्व 1हजारांहून अधिक ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत 27 जानेवारी रोजी काढली.मात्र यावेळी अनेक गावांत अनपेक्षित आरक्षण पडले आहे तर अनेक गावांत आरक्षण तडजोडी करून आपल्या सोयीनुसार काढण्यात आल्याचे आरोप होऊ लागले आहेत. त्यामुळे राज्याच्या 5 जिल्ह्यातील 31 गावातील लोक उच्च न्यायालयात गेल्याने उच्च न्यायालयाने आरक्षण सोडतीवरून संबंधित गावाच्या सरपंच निवडीला स्थगिती दिली आहे. तसेच याबाबत जिल्हाधिकारी यांनी निर्णय घ्यावा असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
त्यामुळे आज घडीला मंगळवारी होणाऱ्या सरपंच निवडी सुद्धा अनिश्चित झाल्या आहेत आणि गावोगावच्या करभाऱ्यांच्या झोपा उडाल्या आहेत. सरपंच होण्यासाठी सदस्यांना सहलीवर घेऊन गेलेल्या उमेदवारांच्या खिशावर ही यामुळे मोठाच भार पडणार आहे.