फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विज्ञानवादी विचारांची पिढी घडवा !

80 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने खा शरद पवारांचे अनुयायांना आवाहन !

टीम : ईगल आय मीडिया

“मी ५० वर्षांपासून राजकारणात काम करतोय. ही संधी महाराष्ट्रातल्या जनतेनं दिली म्हणून इथपर्यंत येता आलं,” असं म्हणत पवार यांनी आभार मानले. तसेच कार्यकर्त्यांना फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांची पिढी घडवण्याचं आवाहन केलं. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त मुंबईत अभिष्टचिंतन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी खा.प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, खा. सुप्रिया सुळे, मंत्री नवाब मलिक, धनंजय मुंढे यांच्यासह पक्षाचे सर्व मंत्री, आमदार, कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना पवार म्हणाले, “माणसाला वय मिळतं. वाढतं जातं. जी विचारधारा आपण स्वीकारली. जे सूत्र स्वीकारलं त्या मार्गानं जाण्याचं काम करायचं असतं. सार्वजनिक जीवनात आपण सगळे काम करतो. शेवटच्या माणसाच्या हितासाठी तुम्ही लक्ष देता, तेव्हा तिथं तुम्हाला समजतं, पुढचा रस्ता कोणता असला पाहिजे ही स्पष्टता येते. जागृत राहून समाजकारण करण्याची संकल्पना राबवली पाहिजे. मी ५० वर्षांपासून राजकारणात काम करतोय. ही संधी महाराष्ट्रातल्या जनतेनं दिली म्हणून इथपर्यंत येता आलं,” असं शरद पवार म्हणाले.
“स्वातंत्र्यपूर्व काळात गांधी-नेहरू विचारांची पताका घेऊन काम केलं पाहिजे हे त्या मातेनं स्वीकारलं आणि कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली. तिचा दृष्टिकोण आम्हाला महत्त्वाचा ठरला. अनेकांनी फुले-आंबेडकरांचा उल्लेख केला. सगळ्यांनी आपल्या नेतृत्वातून दृष्टी दिली. आज त्यांच्या नावाचा उल्लेख करून चालणार नाही. त्यांनी दिलेल्या दृष्टीतून समाज मानसिकता तयार करण्याची जबाबदारी घ्यावी लागले,” असं आवाहन शरद पवार यांनी केलं.


“आज या देशाला भक्कम व्यवस्था बाबासाहेबांनी दिली. पण, त्यांनी इतरही क्षेत्रातही योगदान दिलं. ब्रिटीश सरकारनं नेमलेल्या सरकारमध्ये बाबासाहेबांकडे पाण्याचं खातं होतं. भाक्रा-नांगल धरणाच्या माध्यमातून अन्नधान्याचा प्रश्न सोडण्यास मदत झाली पाहिजे. पाण्यापासून वीज निर्माण केली पाहिजे. बाबासाहेबांनी विज्ञानाचा आधार केला. त्या विचारांची पिढी तयार करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे,” असं शरद पवार म्हणाले.

“मुंबईत पंचम जॉर्जच्या स्वागतासाठी गेट ऑफ इंडिया उभारण्यात आलं. ते जेव्हा भारतात आले, तेव्हा त्या गेटजवळ एक व्यक्ती उभी होती. त्या व्यक्तीला बाजूला करण्याचा प्रयत्न पोलीस करत होते. तेव्हा पंचम जॉर्ज यांनी स्वतः उतरून त्यांची भेट घेतली. ती व्यक्ती म्हणजे ज्योतिबा फुले होते. त्यांच्या हातात पत्र होतं. त्यात संकरित वाण तयार करण्याची मागणी होती. दुसरी मागणी दुग्धव्यवसायासंदर्भातील होती. संकरित गाई निर्माण करण्याची मागणी त्यांनी केली होती. ज्योतिबांना आपण महात्मा मानतो की, त्यांनी विज्ञानाचा आधार घेतला,” असं पवार म्हणाले.

Leave a Reply

error: Content is protected !!